हरित वनांच्या निर्मितीसाठी सीड लड्डू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:52 AM2018-05-31T00:52:31+5:302018-05-31T00:52:31+5:30
महिला पाककलेत निपुण असतात. कधी दिवाळीनिमित्त, तर कधी विविध समारंभासाठी त्या लाडू बनवीत असतात; पण हरित वनांच्या निर्मितीसाठी एक आगळावेगळा उपक्र म साजरा करत झाडांच्या बियांचे म्हणेज सीड लड्डू तयार करण्याची अनोखी कार्यशाळा संपन्न झाली.
नाशिक : महिला पाककलेत निपुण असतात. कधी दिवाळीनिमित्त, तर कधी विविध समारंभासाठी त्या लाडू बनवीत असतात; पण हरित वनांच्या निर्मितीसाठी एक आगळावेगळा उपक्र म साजरा करत झाडांच्या बियांचे म्हणेज सीड लड्डू तयार करण्याची अनोखी कार्यशाळा संपन्न झाली. कम्युनिटी हेल्थ फाउंडेशन व वॉव ग्रुप (वुमन आॅफ विजडम) यांच्या संयुक्त विद्यमाने सीड लड्डू कार्यशाळा त्र्यंबकरोडवरील देना लक्ष्मी कॉलनी येथील समाजमंदिरात आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत माती आणि शेणाच्या मिश्रणात एखादी ‘बी’ घालून त्यातून ‘सीड लड्डू ’ म्हणजेच चिखलाचे गोल लाडू तयार करण्यात आले. या उपक्रमात सहभागी होऊन अनेक महिला, लहान मुलांनी पाच हजार सीड लड्डूची निर्मिती केली. यासाठी बियाणे निवडताना देशी वाण तसेच ज्या झाडांना जनावरे खात नाहीत व उगवण क्षमता जास्तीत जास्त असलेल्या करंज, शिवण व पळस अशा बियांची लागवड सीड लड्डू बनविण्याकरिता करण्यात आली. या उपक्रमात वॉव ग्रुपच्या अध्यक्ष रेखा देवरे, कम्युनिटी हेल्थ फाउंडेशनच्या अश्विनी न्याहारकर, सुरेखा बोडके, यशश्री पवार, वृषाली पाटील, भारती वाघ, सरोज महाजन, शीतल साळी, सीमा पाटील, चंचल पवार, वैशाली मराठे, अर्चना बोथरा, वंदना लोहाडे, अंजू गंगावणे, प्राची पाटील सहभागी झाले होते. ज्या व्यक्तींना सीड लड्डूच्या माध्यमातून वृक्षारोपण करायचे असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. या उपक्र माबाबत माहिती देताना अश्विनी न्याहारकर यांनी हे सीड लड्डू विविध संस्था, कार्यालये, ट्रेकर्स ग्रुप यांसारख्या घटकांना भेट देण्यात येणार आहेत, जेणेकरून हे सीड लड्डू पावसाळ्यात विविध ठिकाणी टाकले जातील, असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.