पेठ तालुक्यातील १०७ गावांमध्ये बीजप्रक्रिया शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:30+5:302021-05-27T04:14:30+5:30
पेठ : खरीप हंगाम तोंडावर आला असताना, पेठ तालुक्यातील शेतकरी बांधवांना योग्य व सकस बियाणे पेरणीसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी ...
पेठ : खरीप हंगाम तोंडावर आला असताना, पेठ तालुक्यातील शेतकरी बांधवांना योग्य व सकस बियाणे पेरणीसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने पेठ तालुक्यातील १०७ गावांमध्ये कोरोनाचे नियम पाळून बीजप्रक्रिया शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले.
पेठ तालुक्यात खरीप हंगामात भात, नागली सह खुरसाणी, उडीद, वरई यासारखी पिके घेतली जातात. साधारण २६ हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट असून, यासाठी बहुतांश शेतकरी घरगुती बियाण्यांचा वापर करतात. यासाठी योग्य उतरण क्षमता असलेले बियाणे तयार करण्यासाठी त्यावर विविध पद्धतीचा वापर करून बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याने, तालुका कृषी विभागाच्या वतीने तीन दिवसीय बीजप्रक्रिया शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली १०७ गावांमधील जवळपास ३०० शेतकऱ्यांना घरगुती बियाण्यांवर नैसर्गिक पद्धतीने बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यामध्ये खिरकडे, शिराळे, करंजाळी, जोगमोडी, बाडगी, जळे, करंजखेड, पातळी, धानपाडा, तिरडे, खंबाळे, अंबापूर आदी प्रमुख गावांचा समावेश आहे.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडळ कृषी अधिकारी श्रीरंग वाघ, मुकेश महाजन, कृषी पर्यवेक्षक संजय साबळे, किरण कडलग, कृषी सहायक जाधव, आहिरे, गडाख, भोये, वाघेरे, चौधरी, घांगळे यांच्यासह कर्मचारी व शेतकरी सहभागी झाले होते.
-------------------
शिराळे ता.पेठ येथे बीजप्रक्रिया शेतीशाळेत प्रात्यक्षिक करताना, कृषी अधिकारी अरविंद पगारे, श्रीरंग वाघ, मुकेश महाजन आदी. (२६ पेठ १)
===Photopath===
260521\26nsk_7_26052021_13.jpg
===Caption===
२६ पेठ १