ओळीत लागवड केल्यास बियाणांची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:34 PM2020-06-17T21:34:33+5:302020-06-18T00:25:45+5:30
नाशिक : चारसूत्री भात लागवड पद्धतीतील तिसरा टप्पा म्हणजे नियंत्रित लावणी. शेतकरी त्यास ओळीत लागवड, जपानी लागवड म्हणूनही ओळखतात. या पद्धतीने लावणी केल्यास प्रतिहेक्टरी ४० ते ४५ किलोऐवजी ३० किलो बियाणात लागवड पूर्ण होते.
नाशिक : चारसूत्री भात लागवड पद्धतीतील तिसरा टप्पा म्हणजे नियंत्रित लावणी. शेतकरी त्यास ओळीत लागवड, जपानी लागवड म्हणूनही ओळखतात. या पद्धतीने लावणी केल्यास प्रतिहेक्टरी ४० ते ४५ किलोऐवजी ३० किलो बियाणात लागवड पूर्ण होते.
लावणी ओळीमध्ये १५-२५, १५-२५ सें.मी. अंतरावर करावी. त्यासाठी प्लॅस्टिक दोरीवर १५ सेंमी, २५ सेंमी अंतरावर आलटून-पालटून बांबूच्या लहान काड्या खोचून खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या खुणांवर प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. खाचरात १५ सेंमी बाय १५ सेंमी चुडाचे चौकोन व २५ सेंमी चालण्याचे रस्ते तयार होतात. लावणी करताना प्रत्येक चुडात दोनच रोपे लावावीत. या पद्धतीने लावणी केल्यास मजूर कमी लागतात. आंतरमशागत करणे, चौरसात खताच्या ब्रिकेट देणे सोपे जाते.
चौथ्या टप्पा म्हणजे युरिया ब्रिकेटचा वापर करणे. यालाच शेतकरी गोळी खत म्हणून ओळखतात. युरिया व डीएपी डायअमोनियम फॉस्फेट या दोन खतांचे अनुक्रमे ६०:४० प्रमाणात मिश्रण करून ब्रिकेटिंग मशीनच्या साहाय्याने ब्रिकेट गोळी तयार करतात.
ब्रिकेटचा वापर भातलावणीनंतर लगेचच किंवा दुसऱ्या दिवशी करावा. १५ बाय १५ सेंमीच्या चौकानाच्या मधोमध चार चुडास एक ब्रिकेट ५ सेंमी खोचावा. ब्र्रिकेटच्या वापरामुळे हेक्टरी ४४ किलो नत्र, २० किलो स्फुरदची बचत होते. तणाला अन्नद्रव्य मिळतात, त्यामुळे तणाचा त्रास कमी होतो. गोळी खताच्या वापरामुळे नत्र-स्फुरदयुक्त अन्नद्रव्ये वाहून जात नाही. दिलेल्या खतापैकी अधिकाधिक अन्नद्रव्ये भात पिकास उपयोगी पडतात.
---------------
पिकाची वाढ होते जोमदार
चारसूत्री भात लागवड पद्धतीने लागवड खर्चात बचत होते. लावण्याच्या आणि कापण्याच्या कामासाठी लागणाºया मजुरांची संख्या कमी लागत असल्याने मजुरीच्या खर्चात ४० टक्क्यांपर्यंत बचत होते. पिकात हवा खेळती राहत असल्याने रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनातही वाढ होते.