लॉकडाऊनमध्ये बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:15 AM2021-05-12T04:15:43+5:302021-05-12T04:15:43+5:30

मंत्रालयात खरीप हंगाम बैठक : कृषीमंत्री दादा भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश मालेगाव : राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक ...

Seed supply should be maintained in lockdown | लॉकडाऊनमध्ये बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवावा

लॉकडाऊनमध्ये बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवावा

Next

मंत्रालयात खरीप हंगाम बैठक : कृषीमंत्री दादा भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश

मालेगाव : राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. याकाळात बियाणांची पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषी विभागाने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वयाचे काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

गेल्यावर्षी सोयाबीन बियाणांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करतानाच शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृतीसाठी विशेष मोहीम घेण्याचे निर्देशही भुसे यांनी यावेळी दिले. मंगळवारी मंत्रालयात भुसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन, कापूस व मका पिकांच्या बियाणांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व बियाणे उत्पादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे व बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

--------------

सोयाबीनसाठी अतिरिक्त बियाणे पुरवठा करावा

सर्वच पिकांच्या बियाणांचा पुरवठा नियोजन आराखड्याप्रमाणे करीत असताना राज्याकरिता विशेष बाब म्हणून सोयाबीन या पिकासाठी १० ते २० टक्के जास्तीचा बियाणांचा पुरवठा करावा, असे आवाहन भुसे यांनी सोयाबीन बिजोत्पादक कंपन्यांना केले. महाबीज कंपनीद्वारे राज्यात सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे गतवर्षीप्रमाणेच ठेवले आहेत. त्यात दरवाढ करण्यात आलेली नाही. याबाबत खासगी कंपन्यांनी देखील पुढाकार घेऊन त्यांच्या कडील सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे शेतकरी बांधवांना परवडतील असे ठेवण्याबाबत आवाहन यावेळी त्यांनी केले.

----------------

यंदा राज्यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

यंदा राज्यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून बियाणे कंपन्यांनी अतिरिक्त बियाणे राज्यासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी, असे भुसे यांनी सांगितले. कापसावर फवारणी आणि वेचणी करणाऱ्या मजुरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याकामी बियाणे कंपन्यांनी देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन करतानाच अन्य राज्यांतून बेकायदा बियाणांची विक्री राज्यात होऊ नये यासाठी कृषी विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Seed supply should be maintained in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.