बीजप्रक्रियेमुळे बुरशीसह विविध रोगांना पायबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:10+5:302021-06-16T04:19:10+5:30
सिन्नर : बियाण्यास बुरशीनाशक, कीटकनाशक, जैविक जिवाणू संवर्धक यांची बीजप्रक्रिया करावी. यामुळे जमिनीतील बुरशी, किडीला पायबंद घालता येतो. तसेच ...
सिन्नर : बियाण्यास बुरशीनाशक, कीटकनाशक, जैविक जिवाणू संवर्धक यांची बीजप्रक्रिया करावी. यामुळे जमिनीतील बुरशी, किडीला पायबंद घालता येतो. तसेच जैविक जिवाणू संवर्धनामुळे जमिनीतील नत्र स्थिरीकरण, स्फुरद आणि पालाश याचे विघटन होऊन पिकास पोषणतत्वे उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक राजेंद्र बिन्नर यांनी केले.
बारागावपिंप्री येथे शेतकरीबांधवांना बीजप्रक्रिया स्पर्धेअंतर्गत बियाणे प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा विपणन अधिकारी (आरसीफ) बजरंग कापसे, सह व्यवस्थापक विशाल सोनवलकर, कृषी सहायक तथा जिल्हा समन्वयक बीज प्रक्रिया स्पर्धा प्रदीप भोर, दशरथ रोडे आदींसह शेतकरी उपस्थित होते. प्रात्यक्षिकाचे नियोजन कृषी सहायक मेघा पेठेकर यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, मेळावे घेण्यास मर्यादा येत आहेत. कृषी विभागाचे कर्मचारी कोविड नियमांचे पालन करीत असले तरी गावात, असे कार्यक्रम घेतल्यास गर्दी होऊ शकते यासाठीच सहायक कृषी अधिकारी परिवार, राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स व महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बीजप्रक्रिया ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली आहे.
-----------------------
जिवाणू संवर्धक वितरणाचा शुभारंभ
स्पर्धेत नोंदणी करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या १०० शेतकऱ्यांना राष्ट्रीय केमिकल फर्टिलयाझर लि. (आरसीफ) या शासकीय कंपनीकडून एक लिटर जैविक बीज प्रक्रिया द्रवरूप जिवाणू संवर्धक पुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार द्रवरूप जिवाणू संवर्धकाचे वितरणाचा शुभारंभ निफाड उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, मंडळ कृषी अधिकारी धनंजय वार्डेकर, संजय पाटील महेश वेठेकर आदीसह कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.