रोपे लागवडीतून करा स्त्रीजन्माचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:12 AM2018-12-13T00:12:31+5:302018-12-13T00:13:09+5:30

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींच्या हद्दींमधील गावांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबाला या दोन वर्षांत कन्यारत्न प्राप्त झाले आहे, अशा शेतकरी कुटुंबांनी स्त्रीजन्माचे स्वागत शेतजमिनीच्या बांधावर दहा रोपांच्या लागवडीने करावे, यासाठी ‘कन्या वनसमृद्धी’ योजना वनमंत्रालयाने सुरू केली आहे.

Seeds of Plantation | रोपे लागवडीतून करा स्त्रीजन्माचे स्वागत

रोपे लागवडीतून करा स्त्रीजन्माचे स्वागत

Next

नाशिक : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींच्या हद्दींमधील गावांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबाला या दोन वर्षांत कन्यारत्न प्राप्त झाले आहे, अशा शेतकरी कुटुंबांनी स्त्रीजन्माचे स्वागत शेतजमिनीच्या बांधावर दहा रोपांच्या लागवडीने करावे, यासाठी ‘कन्या वनसमृद्धी’ योजना वनमंत्रालयाने सुरू केली आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ही योजना राबविली जात असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना शेतकरी कुटुंबाने येत्या जूनपूर्वी रितसर अर्ज जमा करावे, असे आवाहन विभागीय वनअधिकारी श्याम रनाळकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित करण्यासाठी वनविभागाकडून नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. शासनाने याबाबत अध्यादेश काढला असून ‘कन्या वनसमृद्धी’ योजनेअंतर्गत ज्या शेतकरी कुटुंबाला कन्या रत्न प्राप्त होईल त्या कुटुंबाने त्या कन्येच्या नावाने बांधावर दहा रोपे लावावी. अर्जाचे नमुने सामाजिक वनीकरण विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना उपलब्ध क रून दिले जात आहे. त्या नमुना अर्जात आवश्यक ती माहिती भरून संबंधित कुटुंबाने ग्रामपंचायतीकडे जमा करावे. ग्रामपंचायतींना जवळच्या रोपवाटिकेतून प्रती कुटुंबप्रमाणे दहा रोपे पुरविली जाणार आहे. यामध्ये सागाची पाच तर आंबा-२, फणस, जांभूळ, चिंच प्रत्येकी १ अशी दहा रोपे दिली जाणार असल्याचे रनाळकर म्हणाले. जुलै महिन्यात रोपांची लागवड बांधावर करावी. जूनअखेर रोपांची उपलब्धता ग्रामपंचायतींना केली जाणार असल्याचे ते म्हणाले. २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या नावाने रोपे लागवड करता येणार आहे.
वृक्षलागवडीतून अल्पभूधारकांना १०० टक्के लाभ
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना १०० टक्के लाभ मिळवून देणारी रोपे लागवड व संवर्धन योजना राबविण्यात येत आहे. १ जून ते ३० नोव्हेंबर या कालावधीत वृक्षलागवड शेतजमिनीवर किंवा बांधावर करण्याची मुदत आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून प्रती रोपाप्रमाणे तीन वर्षे संगोपन केल्यास ५०७ रुपये तर तसेच प्रतिहेक्टरवर किमान अडीच हजार रोपांची लागवड लाभार्थी करू शकतात. यामध्ये फळझाडांसह सागासारख्या टिंबर वृक्षांच्या प्रजातींचा समावेश असेल. सर्व रोपांचा पुरवठा मोफत केला जाणार आहे.
शहराजवळील खेडींचाही समावेश
महापालिका हद्दीतील गंगापूर, आनंदवल्ली, मखमलाबाद, चेहेडी, एकलहरे, पाथर्डी, पिंपळगाव खांब, म्हसरुळ अशा खेडींमधील शेतकरी कुटुंबेदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शहराजवळ असलेल्या या खेड्यांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबात मागील वर्षी तसेच चालू वर्षी कन्यारत्न जन्माला आले आहे. त्यांनी थेट नाशिकरोड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात संपर्क साधून नमूना अर्ज जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Seeds of Plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.