‘लोकमत’मधील फोटो पाहून ‘पाणी’ देण्यास धावले शासन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 12:05 PM2023-05-18T12:05:27+5:302023-05-18T12:11:27+5:30
श्रीकांत भारतीय यांची हट्टीपाड्याला भेट; महिलांची कसरत टाळण्यासाठी दोन टाक्या, टँकरद्वारे पाणी
नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही दुर्गम भागात पाणी अर्थात जीवनासाठी जीवच धोक्यात घालावा लागतो. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील हट्टीपाडा येथे अशीच जीवघेणी कसरत ‘लोकमत’ने टिपली आणि अत्यंत वस्तुस्थिती दर्शक छायाचित्रातून अनेकजण हेलावले. भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनीदेखील तातडीने अधिकाऱ्यांसमवेत हट्टीपाडा येथे भेट दिली आणि झिरप्यातील पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टाकीमध्ये टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याच नव्हे तर अन्य वाड्यापाड्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि सुरगाणा हे दोन्ही आदिवासी तालुके असून, भौगोलिक स्थितीमुळे येथे पाणी साठवणे शक्य नसते. त्यामुळे उन्हाळ्यात खोल गेलेल्या विहिरी, चारी आणि झिरपे शोधून त्यांना पाणी मिळवावे लागते. त्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते किंवा दऱ्याखोऱ्यातून अत्यंत धोका पत्करून खाली उतरावे लागते. पेठ तालुक्यातील हट्टीपाडा येथे अशीच गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.
या गावातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शासनाच्या वतीने या ठिकाणी झिरप्याच्या वर पाण्याच्या दोन टाक्या बसवण्यात येेणार असून, त्यात टँकरद्वारे पाणी टाकण्यात येेणार आहे. त्यामुळे आता हट्टीपाड्यातील लोकांची तहान मिटण्याची आशा निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील हट्टीपाडा येथे अशीच जीवघेणी कसरत ‘लोकमत’ने १६ मे रोजी टिपली आणि अत्यंत वस्तुस्थिती दर्शक छायाचित्रातून अनेकजण हेलावले.
पेठजवळील हट्टीपाडा येथील पाण्याच्या समस्येचा अत्यंत जिवंत फोटो ‘लोकमत’ने प्रसिद्ध केला. आम्ही राजकारणी असलो, तरी संवेदनशील आहोत. शासन संवेदनशील असल्याने मी आज या ठिकाणी भेट दिली. पंतप्रधान प्रत्येक घरात जल देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथेही जलजीवन मिशनच्या माध्यमातून कामे करण्याची गरज आहे,
हे लक्षात आले. ‘लोकमत’ने छायाचित्रातून वस्तुस्थिती मांडल्याबद्दल आभारी आहे.
- श्रीकांत भारतीय, आमदार