सफाई कर्मचाऱ्यांच्या सेल्फी हजेरीबाबत अहवाल मागविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 06:36 PM2018-03-19T18:36:11+5:302018-03-19T18:36:11+5:30

शासनाचे निर्देश : संघटनांचा सेल्फी हजेरीला विरोध

Seeking a report on the cleaning attendance of the employee | सफाई कर्मचाऱ्यांच्या सेल्फी हजेरीबाबत अहवाल मागविला

सफाई कर्मचाऱ्यांच्या सेल्फी हजेरीबाबत अहवाल मागविला

Next
ठळक मुद्देकर्मचारी संघटनांनी याबाबत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन निवेदन सादर केले होतेआयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील स्वच्छतेबाबतचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे.

नाशिक - महापालिकेच्या आरोग्य विभागाने सफाई कर्मचा-यांची सेल्फी हजेरी सुरू केल्यानंतर कर्मचारी संघटनांनी त्यास विरोध दर्शविला असतानाच आता शासनानेही त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल महापालिका प्रशासनाकडून मागविला आहे. कर्मचारी संघटनांनी याबाबत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.
आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील स्वच्छतेबाबतचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अगोदर अन्य विभागात वेगवेगळ्या पदांवर काम करणा-या ३८९ सफाई कर्मचा-यांना मूळ सेवेत परत जाण्याचे आदेश काढले.त्यानंतर ४५० सफाई कर्मचा-यांच्या बदल्या केल्या. या बदल्यांना सफाई कामगार संघटनांकडून विरोध झाल्यानंतर त्यातील १६१ महिला सफाई कर्मचा-यांच्या बदल्या रद्द करणे प्रशासनाला भाग पडले. त्यापाठोपाठ आरोग्य विभागाने सफाई कर्मचा-यांची सेल्फी हजेरी घेण्यास सुरुवात केली. परंतु, या सेल्फी हजेरीलाही सफाई कर्मचा-यांच्या संघटनांनी तिव्र विरोध दर्शविला. आयुक्तांना निवेदन देऊनही त्यात काहीच बदल होत नसल्याने वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी सुरेश दलोड आणि सुरेश मारू यांनी शासनाच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. त्यानुसार, नगरविकास विभागाने या सेल्फी हजेरीबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल महापालिका प्रशासनाकडून मागविला आहे.
पर्दा पद्धतीला बाधा
संघर्ष समितीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वाल्मिकी, मेघवाळ, मेहतर समाजात पर्दा पद्धत आहे. महिला आपला चेहरा परक्यांना दाखवित नाहीत. त्यामुळे, सफाई कर्मचारी महिलेची जबरदस्तीने सेल्फी हजेरी घेणे पर्दा पद्धतीला बाधा आणणारे ठरेल. वास्तविक सफाई कर्मचा-यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी आहे. ती उपलब्ध करून न देता सेल्फी हजेरीचा आग्रह धरणे चुकीचे असल्याचे सुरेश दलोड, सुरेश मारू, ताराचंद पवार व अनिल बेग यांनी म्हटले आहे.

Web Title: Seeking a report on the cleaning attendance of the employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.