कत्तलीच्या हेतूने बांधलेली १३ जनावरे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 07:18 PM2020-12-18T19:18:15+5:302020-12-19T01:01:16+5:30
मालेगाव : तालुक्यात दावणीला बांधलेल्या जनावरांच्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकाराची अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी गंभीर दखल घेत गुरुवारी रात्री शहरात धाडसत्र राबविले. यात कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली तीन लाख १० हजार रुपये किमतीची १३ जनावरे जप्त करण्यात आली आहेत.
शहर पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. शहरातील कमालपुरा भागात हबीब सोनगीर व मुश्रीफ शैतान यांनी कत्तलीच्या हेतूने जनावरे बांधून ठेवली होती. दोघेही फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन, सहायक पोलीस निरीक्षक काळे व कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या पहिल्या छाप्यात १ लाख २५ हजार रुपये किमतीची ६ जनावरे, तर दुसऱ्या छाप्यात १ लाख ८५ हजार रुपये किमतीची ७ जनावरे जप्त केली आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या चोऱ्या व जनावरांच्या कत्तली रोखण्यासाठी लवकरच गो स्कॉड स्थापन करणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक खांडवी यांनी दिली.