आयटीआयच्या ४१ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:53 AM2018-08-01T00:53:53+5:302018-08-01T00:55:20+5:30
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील डिझेल मेकॅनिक व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांची मारुती सुझुकी कंपनीने टेक्निशियन म्हणून निवड केली आहे. या निवडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
सातपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील डिझेल मेकॅनिक व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांची मारुती सुझुकी कंपनीने टेक्निशियन म्हणून निवड केली आहे. या निवडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र सरकार आणि मारुती सुझुकी कंपनी यांच्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या करारानुसार कंपनीने नाशिक येथील शासकीय आयटीआयमध्ये २० लाख रुपयांची गुंतवणूक करून डिझेल मेकॅनिक व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मारुती के टेन ही नवीन गाडीदेखील भेट दिली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना वेगळे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नाही. थेट प्रशिक्षित विद्यार्थी मारुती सुझुकी कंपनीला मिळणार आहेत. यावर्षी डिझेल मेकॅनिक व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणाºया ५३ विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यापैकी ४१ विद्यार्थ्यांची (त्यात ९ मुलींचा समावेश आहे) निवड करण्यात आली आहे. या ४१ विद्यार्थ्यांना तत्काळ रोजगार उपलब्ध झाला आहे. मारुती सुझुकी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक नवनीत आणि क्षेत्रीय व्यवस्थापक सनी वालिया यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविध डीलर्सकडे टेक्निशियन म्हणून नोकरी मिळणार आहे. यावेळी संस्थेचे प्राचार्य सुभाष कदम, उपप्राचार्य सतीश भामरे, गटनिदेशक प्रशांत बडगुजर, श्रीरत्न बर्डे आदी उपस्थित होते. मारुती सुझुकी कंपनीने कुशल मनुष्यबळ मिळावे म्हणून पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक येथील शासकीय आयटीआयमध्ये मोठी गुंतवणूक करून विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरित रोजगार उपलब्ध होणार आहे आणि कंपनीला कुशल मनुष्यबळ मिळणार आहे. तसा राज्य सरकार आणि कंपनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. - सनी वालिया, विभागीय व्यवस्थापक, नाशिक