मालेगाव मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:43 AM2019-07-21T00:43:19+5:302019-07-21T00:44:23+5:30
मालेगाव महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची आणि महिला व बाल कल्याण समितीच्या ९ सदस्यांची शनिवारी झालेल्या विशेष महासभेत निवड करण्यात आली आहे.
मालेगाव : महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची आणि महिला व बाल कल्याण समितीच्या ९ सदस्यांची शनिवारी झालेल्या विशेष महासभेत निवड करण्यात आली आहे.
महापौर रशीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत विशेष महासभा पार पडली. स्थायी समितीच्या १३ सदस्यांनी राजीनामे सादर केल्यानंतर महासभेत सर्वपक्षीय गटनेत्यांनी स्थायी समिती आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांची नावे असलेली बंद पाकिटे महापौर रशीद शेख यांच्याकडे सादर केली होती. नगरसचिव राजेश धसे यांनी बंद पाकिटे उघडून गटनेत्यांनी सादर केलेली नावे सभागृहात वाचून दाखविली. यापूर्वी स्थायी समिती सदस्य असलेल्या कॉँग्रेसच्या ताहेरा शेख, शिवसेनेचे जयप्रकाश बच्छाव, एमआयएमचे डॉ. खालीद परवेझ यांची नावे व निवड वगळता इतर नवीन सर्वपक्षीय १३ सदस्यांची निवड करण्यात आली. १६ सदस्यीय असलेल्या स्थायी समितीत कॉँग्रेसकडून हमीदाबी शेख जब्बार, निहाल अहमद मो. सुलेमान, अन्सारी मो. अस्लम खलील अहमद, रशीदाबी अब्दुल मनान, फकीर मो. शेख सादीक, महागठबंधन आघाडीकडून सय्यद शबानाबानो सय्यद अकील, जैबुनिसा समसुदोहा, अन्सारी आय्याज अहमद मो. सुलतान, अन्सारी मो. सादीक मो.रशीद, मोहंमद सुभान मो. अय्युब, शिवसेनेचे नीलेश आहेर, भाजपचे मदन गायकवाड, भरत बागुल आदींची निवड करण्यात आली. तर महिला व बाल कल्याण समितीत कॉँग्रेसच्या मो. कमरुन्निसा रिजवान, नुरजहॉँ मो. मुस्तफा, सलीमाबी सय्यद सलीम, महागठबंधन आघाडीच्या अन्सारी साजेदा रशीद, अख्तरुन्निसा मोहंमद सादीक, अन्सारी साबीया मोहंमद मुज्जमील, शिवसेनेच्या कविता बच्छाव, भाजपच्या सुवर्णा शेलार, एमआयएमच्या मोमीन रजीया शाहीद अहमद आदींची निवड करण्यात
आली.
सभागृहातील पक्षीय बलाबलानुसार कॉँग्रेसचे ६, महागठबंधन आघाडीचे ५, शिवसेना- भाजप प्रत्येकी २ व एमआयएमचे १ अशा सोळा सदस्यांची वर्षभराच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे. विद्यमान स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव यांचा कार्यकाळही १३ आॅगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. यासाठी निवडप्रक्रिया घेतली जाणार असून, एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड निश्चित मानली जात आहे.
यांनी दिले राजीनामे
महापालिकेचे स्थायी समितीचे सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी विशेष महासभेत राजीनामे सादर केले होते. यात कॉँग्रेसचे रिहानाबानो ताजोद्दीन, अब्दुल अजीज अब्दुल सत्तार, नजीर अहमद इर्शाद, सलीमाबी सय्यद सलीम, शिवसेनेचे नारायण शिंदे, कल्पना वाघ, महागठबंधन आघाडीचे शेख जाहीद शेख जाकीर, अ. बाकी मो. इस्माईल, अन्सारी अतिक कमाल, यास्मीनबानो एजाज बेग, भाजपचे सुनील गायकवाड, विजय गोविंद या तेरा सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर नवीन तेरा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
महापौर निवडणुकीत साथ देणाऱ्या शिवसेना, एमआयएम या पक्षांना स्थायी समिती सभापतीपद प्रत्येकी एक वर्षासाठी देण्याचा शब्द महापौर रशीद शेख यांनी दिला होता. शिवसेनेला सभापतीपद देण्यात आले आहे. आता एमआयएमला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.