स्थायी समितीवर सात सदस्यांची निवड
By admin | Published: February 26, 2016 11:49 PM2016-02-26T23:49:56+5:302016-02-27T00:03:53+5:30
मनसेची जागा रिक्त : कॉँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोड
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवरील रिक्त झालेल्या आठ पैकी सात जागांवर सदस्यांची निवड विशेष महासभेत महापौर अशोक मुर्तडक यांनी घोषित केली. सत्ताधारी मनसेने सदस्याचे नावच न दिल्याने जागा रिक्त राहिली, तर कॉँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. शिवसेनेने मात्र राजकीय ‘गॉडफादर’ नसलेल्या उपेक्षित महिला सदस्यांना संधी दिली.
स्थायी समितीवरील शिवसेनेचे शैलेश ढगे, शोभा फडोळ आणि रिपाइंच्या ललिता भालेराव, भाजपाचे प्रा. कुणाल वाघ व रंजना भानसी, मनसेच्या सुरेखा भोसले, कॉँग्रेसचे राहुल दिवे आणि अपक्ष रशिदा शेख हे आठ सदस्य निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर महापौरांनी विशेष महासभेत त्या-त्या पक्षांच्या गटनेत्यांनी दिलेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. त्यात शिवसेनेकडून मनीषा हेकरे, मंगला आढाव, तर रिपाइंकडून प्रकाश लोंढे यांना संधी देण्यात आली. भाजपाने दिनकर पाटील व फुलावती बोडके, कॉँग्रेसकडून शाहू खैरे यांची नावे घोषित झाली. अपक्षांकडून रशिदा शेख यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. मनसेच्या सुरेखा भोसले यांच्या रिक्त जागांवर मनसेने सदस्य न दिल्याने सदर जागा रिक्त राहिल्याचे महापौरांनी जाहीर केले. दरम्यान, भाजपाकडून फुलावती बोडके यांचे नाव निश्चित मानले जात होते, परंतु दुसऱ्या जागेवर एकमत होत नव्हते. दुसऱ्या जागेसाठी स्वत: गटनेते संभाजी मोरुस्कर यांचे नाव आघाडीवर होते, परंतु मुंडे गटाचे मानले जाणारे दिनकर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेकडून माजी महापौर विनायक पांडे, हर्षा बडगुजर यांची नावे चर्चेत होती, परंतु श्रेष्ठींकडून उपेक्षित राहिलेल्या सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने बाहुबली उमेदवारांची नावे मागे पडली. त्यामुळे मनीषा हेकरे व मंगला आढाव यांच्या नावाचे पत्र महापौरांकडे सुपुर्द करण्यात आले. अपक्ष गटाकडूनही दामोदर मानकर इच्छुक होते, परंतु रशिदा शेख यांनाच पुन्हा संधी देण्यावर एकमत झाले. दरम्यान, मनसेकडून उर्वरित चारही सदस्यांचे राजीनामे घेऊन सर्वच्या सर्व पाच जागांसाठी स्वतंत्रपणे निवडप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)