शेतकऱ्यांसाठी स्वयंआर्थिक विकास आराखडा
By admin | Published: July 8, 2017 12:04 AM2017-07-08T00:04:54+5:302017-07-08T00:05:16+5:30
नाशिक : विभागात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आराखडा आखण्यात येणार असल्याची माहिती महसूल आयुक्त महेश झगडे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक विभागात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्वयंआर्थिक विकास आराखडा आखण्यात येणार असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे वेगवेगळी कारणे असून, अशा कारणांच्या मुळाशी जाऊन त्यावर सर्वांगीण विचार व्हावा, तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी या आराखड्याच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करणे शक्य होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी शुक्रवारी (दि. ७) सिनिअर जर्नलिस्ट फोरमसोबत शासकीय विश्रामगृहात संवाद साधला. यावेळी संपूर्ण देशभरात सध्या ऐरणीवर असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना झगडे म्हणाले, विभागीय स्तरावर सर्व जिल्ह्णांतील गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक व तहसीलदार यांच्या माध्यमातून गावसल्लागार नेमण्यात येणार असून, त्यांच्यावर गावातील तणावग्रस्त कुटुंबांचे निरीक्षण करून त्यांच्या समुपदेशानाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप होते, परंतु जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर विकासदर अथवा एकूण उत्पन्न ठरविण्याची यंत्रणा नाही. अशी यंत्रणाही विकसित होण्याची गरज आहे. तसेच वेगवेगळ्या हंगामात उत्पादित होणारा माल व त्यासाठी बाजारपेठ याविषयाचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. उत्पादित मालाचा आढावा घेण्यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा आढावा घेऊन शेतमाल उत्पादनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन प्राप्त झाल्यास शेतकरीवर्गाच्या नियमित वार्षिक उत्पन्नात वाढ घडवून आणणे शक्य आहे, असा विश्वास व्यक्त करतानाच कृषी विद्यापीठांचे कृषिबाजार विद्यापीठांमध्ये रूपांतर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. झगडे यांनी फोरमच्या सदस्यांसोबत विभागातील विविध भागांतील घडामोडींविषयी माहिती मिळवितानाच समृद्धी महामार्ग, नाशिक-पेठ-सुरत महामार्ग, रोजगार, एनए जमिनींचे परवाने, अवयवदान चळवळ, गोदावरी प्रदूषण, गुटखा बंदी, प्रशासकीय यंत्रणा आदी वेगेवेगळ्या विषयांवर दिलखुलास संवाद साधला.