युवकांचे प्रसंगावधान : इंदिरानगरमध्ये मोकाट गायींचा महिलेवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:57 PM2018-04-19T15:57:34+5:302018-04-19T15:57:34+5:30
लहान मुलांमध्येही यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून शाळांना सुट्ट्या लागूनदेखील मुले संध्याकाळच्या सुमारास कॉलनीमधील मोकळे भुखंड अथवा उद्यानांमध्ये खेळण्यास जाण्यासाठी जनावरांच्या भीतीपोटी तयार होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
नाशिक : सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ महिलेवर परिसरातील मोकाट जनावरांपैकी गायींनी हल्ला चढविला. या हल्ल्यात शोभना जोशी या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, परिसरातील काही युवकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून धाव घेत गायीच्या तावडीत सापडलेल्या जोशी यांची सुटका केली.
इंदिरानगर परिसरातील पाटील गार्डन येथील रहिवाशी असलेल्या जोशी या नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजेच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घरातून निघाल्या. आत्मविश्वाससोसायटी लगत असलेल्या निरंजन पाक समोरून जात असताना अचानकपणे पाच ते सहा गायींनी त्यांच्यावर चाल करत हल्ला चढविला. गायींनी शिंगानी लाथांनी मारण्यास सुरूवात केली. हा प्रकार सुधीर पाऊल, प्रवीण खरात,अजय खरात, कल्पेश सोनवणे, राहुल विंचूरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेत गायींना हुसक वून लावत जोशी यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. दरम्यान, युवकांनी वेळीच धाव घेतली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. कारण सर्वच गायी आक्रमक झालेल्या होत्या. त्यामुळे जोशी यांना त्यांच्यापासून बचाव करणे अवघड झाले होते. युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे जोशी यांचा जीव वाचला; मात्र गायींच्या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
परिसरात मोकाट जनावरे अक्षरशा हौदोस घातला असून त्यांना पकडण्याची मोहीम थांबली आहे. कारण संबंधित ठेकेदाराला सुमार दोन वर्षांपासून पैसे न दिल्याने त्याने काम थांबविल्याचे समजते. परिसरातील जनावरांचे मालक सकाळी आपल्या जनावरांना चराईसाठी सोडून देतात व सायंकळी पुन्हा आपल्या मालकाचा घरी मोकाट जनावरे परततात; परंतु या काळात ही मोकाट जनावरे रस्त्यावर किंवा मोकळ्या मैदानावर ठाण मांडून बसतात. दरम्यान, जनावरांकडून वाहनांवर तसेच पादचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडतात. लहान मुलांमध्येही यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून शाळांना सुट्ट्या लागूनदेखील मुले संध्याकाळच्या सुमारास कॉलनीमधील मोकळे भुखंड अथवा उद्यानांमध्ये खेळण्यास जाण्यासाठी जनावरांच्या भीतीपोटी तयार होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिकेच्या संबंधित विभागाने याबाबत दखल घेऊन तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.