‘सेल्फी’ने शिक्षकांमध्ये नाराजी
By admin | Published: November 5, 2016 12:05 AM2016-11-05T00:05:23+5:302016-11-05T00:05:23+5:30
दुर्गम भागात अडचणी : इंटरनेटची सुविधा नसलेल्या गावांमध्ये कसरत
पेठ : आधीच सरल डाटा प्रणालीत विद्यार्थी, शिक्षक व शाळेची माहिती अपलोड करताना वैतागलेल्या शिक्षकांची ‘सेल्फी विथ स्टुडंट’ या नवीन फतव्याने डोकेदुखी वाढणार असून, खेडोपाडी मोबाइल व इंटरनेटची सुविधा नसलेल्या गावात अशा प्रकारच्या सेल्फी अपलोड करताना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. शिवाय ज्या शिक्षकांकडे अॅण्ड्रॉइड मोबाइल नाहीत, अशा शिक्षकांनी सेल्फी कशी अपलोड करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रगत महाराष्ट्र घडवत असताना शिक्षकांना अध्यापन सोडून अशा प्रकारे अशैक्षणिक कामांचा बोझा पडत असल्याने शिक्षकांची या कामातून सुटका करून स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
शाळेत अनियमित असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेण्यासाठी शासनाने नावीन्यपूर्ण उपक्र म राबविण्याचा फतवा काढला असून, आता शिक्षकांना दर सोमवारी शाळेच्या मुलांसमवेत सेल्फी काढून ती सरल प्रणालीत अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्याने आता शिक्षकांना सेल्फी वुईथ स्टुडंट पाहता येणार आहे.२
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने काढलेल्या एका परिपत्रकात अनेक प्रयत्न करूनही शाळेच्या प्रवाहात न येणाऱ्या व राज्यांतर्गत विविध कारणांनी स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना सुचविलेल्या आहेत. यामध्ये स्थलांतराचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा कुटुंबांनी आपली मुले जवळच्या नातेवाइकांकडे अथवा हंगामी वसतिगृहात दाखल करावित, अशा सूूचना देण्यात आल्या आहेत.
प्रयत्न करूनही स्थलांतर होणाऱ्या मुलांची कोठे स्थलांतरित झाले याची पालकांच्या मदतीने माहिती घेऊन अशा गावातील मुख्याध्यापकांना व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया अथवा ई-मेलचा वापर करून शिक्षणाचे हमीपत्र ट्रान्सफर करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे शाळाबाह्य विद्यार्थीसंख्या कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा शासनाकडून करण्यात येत आहे.