जागा पाच कोटी ६२ लाख रुपयांना विक्री
By admin | Published: May 15, 2015 01:26 AM2015-05-15T01:26:48+5:302015-05-15T01:27:33+5:30
जागा पाच कोटी ६२ लाख रुपयांना विक्री
नाशिक : पायाभूत सुविधांसाठी शिवाजीवाडी आणि निलगिरीबाग येथे ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र उभारण्याकरिता महावितरण कंपनीला नाशिक महापालिकेने एकूण ४५०० चौ.मी. इतकी जागा पाच कोटी ६२ लाख रुपयांना विक्री केली आहे, तर दुसरीकडे महावितरणने तपोवन आणि गणेशवाडी येथे मात्र विद्युत उपकेंद्र उभारणीकरिता ४००० चौ.मी. इतकी जागा विनामोबदला मागितली असून, त्यास महासभेने विरोध दर्शविल्यानंतर शासनाने अगोदर निलंबित केलेला महासभेचा ठराव आता विखंडित होण्याचे संकेत मिळत असल्याने महापालिकेने न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे. महावितरण कंपनीने सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तपोवन येथे २००० चौ.मी., तर गणेशवाडी येथे १००० चौ.मी. जागा ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र उभारणीकरिता महापालिकेकडे विनामोबदला मागितली आहे. मात्र, महापालिकेच्या स्थायी समितीबरोबरच महासभेनेही महावितरणाचा सदरचा प्रस्ताव फेटाळून लावत विनामोबदला जागा देण्यास नकार दर्शविला होता. सिंहस्थाशी संबंधित काम असल्याने शासनाने महासभेचा सदर ठराव पूर्णत: निलंबित करत महावितरणला मोफत जागा देण्याचे आदेश काढले होते; परंतु पुन्हा एकदा महासभेने शासनाचाही प्रस्ताव ठुकरावून लावत त्यासंबंधी अपील शासनाकडे केले असून, सध्या शासनदरबारी अपील प्रलंबित आहे. मात्र, सिंहस्थाची तातडीची गरज लक्षात घेता शासनाकडून महासभेचा ठराव विखंडित करण्याचे संकेत मिळत असून, तसे झाल्यास महापालिकेनेही उच्च न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे. एकीकडे महापालिकेचे दोन भूखंड विनामोबदला मागणाऱ्या महावितरण कंपनीने मात्र, मौजे नाशिक शिवारातील शिवाजीवाडी येथील २००० चौ.मी. क्षेत्राचा भूखंड आणि पंचवटीतील निलगिरीबाग येथील २५०० चौ.मी. क्षेत्र इतका भूखंड प्रचलित बाजारमूल्यानुसार खरेदी करण्याची तयारी दर्शविली. महापालिकेनेही मोबदला मिळत असल्याने शिवाजीवाडी येथील भूखंड दोन कोटी ३२ लाख रुपये, तर निलगिरीबाग येथील भूखंड तीन कोटी ३० लाख रुपयांना विक्री करण्यास महासभेची मान्यता मिळाल्यानंतर खरेदी-विक्रीचे सोपस्कार पार पाडले. या दोन्ही भूखंड विक्रीतून मनपाला पाच कोटी ६२ लाख रुपयांची कमाई झाली आहे. (प्रतिनिधी)