कलाशिक्षकांचे लाक्षणिक उपोषण
By Admin | Published: May 30, 2017 12:33 AM2017-05-30T00:33:12+5:302017-05-30T00:33:24+5:30
व्हिजन कलाशिक्षक संघ व मुख्याध्यापक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आवारात आंदोलन करीत लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव तासिका कलाशिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच कलाशिक्षक संघटना तसेच मुख्याध्यापक संघटनांना विश्वासात न घेता कला कलाशिक्षणाचा दोन तासिका कमी करून कलाशिक्षकांवर अन्याय केला असल्याचा आरोप करीत व्हिजन कलाशिक्षक संघ व मुख्याध्यापक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आवारात आंदोलन करीत लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.
शासनाने २८ एप्रिल २०१७ रोजी परिपत्रक काढून कलाशिक्षकांच्या दोन तासिका कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कला क्रीडा संगीत व कार्यानुभव अशा विविध कलाशिक्षणाच्या प्रत्येक वर्गासाठी ४ तासिका होत्या. त्यात शासनाने दोन तासिकांची कपात केल्याने कलाशिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लाक्षणिक उपोषणही केले.
शासनाचे शिक्षण क्षेत्रातील रोजचे विविध बदल करण्याचे सर्व प्रयोग आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत. अशा प्रकारे कलाविषयांच्या तासिकांना कात्री लावून महाराष्ट्राची कला, क्रीडा, संस्कृती संपविण्याचा घाट घातला
जात असल्याचे व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय सांगळे यांनी सांगितले.