नाशिकमध्ये वाढीव बिल वसुलीसाठी अर्ध नग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 01:37 AM2021-05-26T01:37:27+5:302021-05-26T01:39:40+5:30
शहरातील एका कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवरील उपचारापोटी जास्त बिल आकारल्याचा आरोप करीत रुग्णाचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भाभे यांनी मंगळवारी (दि. २५) हॉस्पिटलच्या बिलिंग ऑफिससमोर चक्क कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले; आणि वाढीव रक्कम रुग्णाच्या नातेवाइकांच्या खात्यावर वर्ग काढण्यास भाग पाडले. या गांधीगिरी आंदोलनानंतर मात्र गाेेंधळ उडाला.
नाशिक : शहरातील एका कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवरील उपचारापोटी जास्त बिल आकारल्याचा आरोप करीत रुग्णाचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भाभे यांनी मंगळवारी (दि. २५) हॉस्पिटलच्या बिलिंग ऑफिससमोर चक्क कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले; आणि वाढीव रक्कम रुग्णाच्या नातेवाइकांच्या खात्यावर वर्ग काढण्यास भाग पाडले. या गांधीगिरी आंदोलनानंतर मात्र गाेेंधळ उडाला. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतल्यानंतर भाभे यांनी फेसबुकवरून पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यामुळे पोलिसांचे फोन तर खणाणलेच शिवाय मुंबई नाका पोलीस ठाण्यावर गर्दी जमली.
जितेंद्र भाभे यांनी कोविड काळात शासन नियमापेक्षा अधिक दराने बिले आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या विरोधात ऑपरेशन हॉस्पिटल मोहीम राबवली आहे. अनेक रुग्णालयांसमोर त्यांनी आंदोलने केली आहेत. त्यात शहरातील वोक्हार्ट रुग्णालयात मंगळवारी (दि. २५) अर्धनग्न आंदोलन करताना फेसबुक लाइव्ह करून खळबळ उडवून दिली. सिन्नर तालुक्यातील एका युवकाचे सहा नातेवाईक या रुग्णालयात दाखल होते. त्यापैकी चार जणांनी जीव गमावले आहेत. मात्र, रुग्णाच्या नातेवाइकांकडून जादा बिल आकारले आहे. ते परत मिळावे यासाठी संबंधित युवकाने दाद मागूनही उपयाेग न झाल्याने भाभे यांनी त्या युवकासोबत जाऊन रक्कम मागितली आणि वाढीव बिलाची दीड लाख रुपयांची रक्कम रुग्णांच्या नातेवाईक असलेल्या युवकाच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत अर्धनग्न होऊन ऑफिससमोरच ठिय्या मांडू, असे जाहीर केले. हे सर्व त्यांनी फेसबुक लाइव्ह करून नागरिकांना दाखविण्यास सुरुवात केली. संबंधित रुग्णालयाकडून पीपीई किटचे अडीच हजार रुपये घेण्यात आले तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एचआरसीटीसाठी दोन हजार रुपये दर निश्चित केले असताना या हॉस्पिटलमध्ये मात्र पाच हजार रुपये घेण्यात आले, असे फेसबुकवर त्यांनी सांगितले. इतकेच नव्हेतर, रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी हात लावल्यास सगळेच कपडे काढण्याचा इशारा दिल्याने कोणालाही काही करता आले नाही. हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी त्या नातेवाइकाला बोलावून त्याचे बँक डिटेल घेतले. त्यानंतर १ लाख ४० हजार रुपये परत केल्याचे सांगण्यात आले.
इन्फो...
कपडे काढून आंदोलन करताना जितेंद्र भाभे यांनी रुग्णाचे नातेवाईक असलेला युवक हा सिन्नर तालुक्यातील असून, तो सिन्नर औद्याेगिक वसाहतीत सात हजार रुपये या मासिक वेतनावर काम करतो, त्याच्या घरातील सहा जण रुग्णालयात दाखल होते. त्याच्या काका-काकूंसह चार जण दगावल्याचेही सांगितले.
इन्फो..
आंदोलनानंतर पोलिसांनी भाभे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे परंतु अटक केली नाही, असे खोटे सांगत असल्याचे नमूद केले. त्यानंतर पोलीस ठाण्यात दूरध्वनी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पोलीस इतके त्रस्त झाले की त्यांनी रिसिव्हर काढून बाजूला ठेवला. त्यानंतर भाभे यांच्या समर्थनार्थ नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात जमले होते.