सेमिक्रिटकल झोन : चांदवड तालुक्यातील ३६ गावांतील विहिरींची पातळी खोल विहीर योजनेपासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:42 AM2018-06-01T00:42:38+5:302018-06-01T00:42:38+5:30
दरेगाव : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सर्व्हे करून जिल्ह्यातील सेमिक्रिटिकल, क्रिटिकल व ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेण्यात येऊ नये याबाबत बंदी करण्यात आली आहे.
दरेगाव : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सर्व्हे करून जिल्ह्यातील सेमिक्रिटिकल, क्रिटिकल व ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेण्यात येऊ नये याबाबत बंदी करण्यात आली आहे. त्यात चांदवड तालुक्यातील ३६ गावे सेमिक्रिटिकल झोनमध्ये येतात.
चांदवड तालुक्यातील अनेक गावांची भूजलपातळी अत्यंत खालावली आहे. त्यासाठी पाण्याचा अतिउपसा कारणीभूत आहे. त्यामुळे या गावांमध्ये शासकीय योजनेतून नवीन विहीर खोदण्याचा मार्ग बंद झाला. पाण्याचा अतिउपसा होऊ नये म्हणून सदर निर्णय योग्य वाटत असला तरी त्यामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या असक्षम शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होणार आहे. यासाठी विहीर पुनर्भरण सक्तीचे करणे आवश्यक आहे. या गावांमधील बहुतांश गावांमध्ये शेतीच्या सिंचनासाठी पिके घेण्यासाठी विहिरी व्यतिरीक्त अन्य व्यवस्था कमी आहे. पाटाच्या पाण्याची सोय नाही. पर्जन्यमान कमी असते. वर्षातून एकच पीक निघते व त्यातही पाणी देण्याची सोय नसल्यास केवळ पावसाच्या पाण्यावर पिके जगवायची कशी यासारख्या विवंचनेत विशेषत: अनु. जाती व जमातीचे शेतकरी आहेत. शेततळ्यात पाणी साठवण करणे महागड्या खर्चामुळे गरीब शेतकºयांच्या आवाक्याबाहेरचे आहे.
सदर बंदीचा फटका फक्त गरीब शेतकºयांना बसणार असून आर्थिकदृष्ट्या संपन्न शेतकºयांकडे पाणी उपशासाठीच्या विहिरी, विंधन विहिरी, शेततळे यासारखी साधने असल्याने त्यांना मात्र समस्या निर्माण होत नाही.
त्यामुळे ही बंदी उठविण्याची मागणी होत आहे. चांदवड तालुक्यातील उसवाड, डोंगरगाव, दुगाव, कोकणखेडे, पिंपळगाव धाबळी, रायपूर भडाणे, वाद, वराडी, कानडगाव, कुंदलगाव, निमोण, दरेगाव, भोयेगाव, मेसनखेडे बुद्रुक, मेसनखेडे खुर्द, डोणगाव, शिंगवे, दहेगाव (मनमाड), वागदर्डी, रापली, वडगावपंगु, कातरवाडी, राजदेरवाडी, नांदुरटेक, वडबारे, इंद्रायवाडी, राहुड, हट्टी, जैतापूर, एकरुखे, जांबुटके, पिंपळनारे, वडनैरभैरव, खडकजांब, धोतरखेडे, ही गावे सेमिक्रि टिकल वाटर शेडमध्ये येतात. यापूर्वीही चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील २२ गावे डार्क वॉटर शेडमध्ये होती; मात्र आठ वर्षांपूर्वी या गावातील विहिरींवरील बंदी शासनाने उठविली होती. त्याचप्रमाणे आताही शासनाने सदर बंदी उठविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीची जवाहर रोजगार योजना गेल्या अनेक वर्षापासून लक्षांकाअभावी बंद असून ही योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.