सेना-भाजपामध्ये सिन्नरला खडाजंगी
By admin | Published: July 7, 2017 11:20 PM2017-07-07T23:20:32+5:302017-07-07T23:37:38+5:30
सिन्नर : पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीस सीमंतिनी कोकाटे उपस्थित राहिल्याने शिवसेना व भाजपा गटामध्ये खडाजंगी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीस भाजपाच्या देवपूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे उपस्थित राहिल्याने सत्ताधारी शिवसेना व विरोधी भाजपा गटामध्ये जोरदार खडाजंगी झाली. जिल्हा परिषद सदस्य कोकाटे या सभापतींची पूर्वपरवानगी न घेता बैठकीत बसल्याचा आरोप करीत सत्ताधारी शिवसेना गटाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभापतींनी बैठक तहकूब केल्याची घोषणा केली.
पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीस सभागृहात शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे यांच्यासह पाच सदस्य उपस्थित होते. त्यानंतर सभागृहात जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्यासह भाजपाचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, तातू जगताप व योगीता कांदळकर यांचे आगमन झाले.
सभागृहाचे कामकाज सुरू होेताच शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे यांनी जिल्हा परिषद सदस्य कोकाटे यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला. सभापतींची परवानगी न घेता त्या सभागृहात बसल्याच कशा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकाटे यांनी सभापती बर्डे यांच्याकडे सभागृहात बसण्याची परवानगी मागितली. गेल्या बैठकीस नांदूरशिंगोटे गटाचे सदस्य नीलेश केदार यांना बैठकीत बसू दिले होते. त्यामुळे या बैठकीस आपणास बसण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती कोकाटे यांनी सभापती बर्डे यांच्याकडे केली. बर्डे यांनी या बैठकीत बसा, मात्र यापुढे कोणालाही बैठकीस बसू दिले जाणार नाही असे सांगितले. मात्र कातकाडे यांनी पूर्वपरवानगी घेतले नसल्याचे सांगत त्यांना विरोध केला. त्यानंतर गटनेते कातकाडे यांच्यासह शिवसेनेचे सदस्य जगन पाटील भाबड, भगवान पथवे, रोहिणी कांगणे यांच्यासह शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभापती सौ.बर्डे याही सभागृह सोडून गेल्या. त्यामुळे कोकाटे यांच्यासह भाजपाच्या सदस्यांनी सभापती बर्डे यांचे दालन गाठले. पुढील बैठकीस बसू द्यावे अशा लेखी मागणीचे पत्र सभापती बर्डे यांना देऊ केले. अगोदर बर्डे यांनी पोहच देण्यास नकार दिला. त्यामुळे सभापतींच्या दालनातच सत्ताधारी शिवसेना व विरोधी गटाच्या सदस्यांत पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर सभापती बर्डे यांनी पत्रावर पोहच म्हणून स्वाक्षरी दिल्यानंतर भाजपाचे सदस्य दालनातून बाहेर पडले.
त्यानंतर प्रभारी गटविकास अधिकारी भारत धिवरे यांच्या दालनात कोकाटे यांच्यासह भाजपाच्या सदस्यांनी प्रवेश केला. जलयुक्त शिवार योजनेच्या गाळ काढणे व नाला सरलीकरणाच्या कामाबाबत भाजपाच्या सदस्यांनी तक्रार केली असताना २४ पैकी १७ कामे एकाच संस्थेस का देण्यात आली याचा जाब विचारण्यात आला. गटविकास अधिकारी तक्रारींची दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.