दिंडोरी नगरपंचायतीत भाजपला सेनेने झिडकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 10:43 PM2022-02-05T22:43:46+5:302022-02-05T22:44:58+5:30
दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने शिवसेना-काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता स्थापनेच्या हालचाली चालवल्या होत्या; परंतु शिवसेनेचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजपला झुगारून राष्ट्रवादीचा हात धरल्याने भाजपचा मुखभंग झाला आहे. दरम्यान, भाजपचे नगरसेवक तटस्थ राहणार असल्याची माहिती गटनेत्या अरुणा रणजित देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक १५ फेब्रुवारी रोजी होत असून त्या पार्श्वभूमीवर भाजप गटनेत्या अरुणा रणजित देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत दिंडोरीकरांनी माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या सर्वाधिक ८ जागा निवडून देऊन राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात कौल दिला होता. त्या जनमताचा आदर राखून भाजप नगरसेवकांनी चारोस्कर गटासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेतला होता. त्याप्रमाणे भाजपच्या नगरसेवकांनी चारोस्कर गटाला आपला निर्णय कळवला होता; परंतु माजी आमदार चारोस्कर गटाच्या सर्व अटी, शर्ती मानून सुद्धा अचानकपणे चारोस्कर गट व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाल्याचे चारोस्कर गटाकडून समजले आहे. त्यामुळे भाजपचे चारही नगरसेवक पुढील कार्यकाळात सक्षम विरोधी पक्षाची भूमिका जनतेच्या हितासाठी बजावण्यास तयार आहेत. त्यानुसार भाजपने जनमताचा आदर राखत नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली आहे.यापुढे जनतेच्या प्रश्नावर लढत राहू असेही गटनेत्या अरुणा रणजित देशमुख यांनी सांगितले.
शिवसेनेचा होणार नगराध्यक्ष
निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक ६ ,काँग्रेसला २, राष्ट्रवादीला ५ तर भाजपचे चार नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेस शिवसेनेने आघाडी केली होती. त्यांना बहुमतासाठी एक जागा कमी होती. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने भाजपची भूमिका निर्णायक ठरणार होती. भाजपला दोन्ही गटाकडून ऑफरची चर्चा होती; मात्र शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.यानंतर भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.प्रत्यक्ष नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीपर्यंत काय राजकीय घडामोडी घडतात तसेच नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष म्हणून कुणाला संधी मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.