बंडखोरीची पश्चिम मतदारसंघात सेनेची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 07:00 PM2019-10-08T19:00:54+5:302019-10-08T19:04:31+5:30

२००९ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नाशिक पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. सिडको, अंबडगाव, चुंचाळे, सातपूर या भागाचा मतदारसंघात समावेश असून, कामगार व मध्यमवर्गीयांचा अधिक भरणार आहे. खान्देश व कसमादे येथील मतदारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे त्या त्या भागातील राजकीय वातावरणाचा अप्रत्यक्ष पश्चिम मतदारसंघात परिणाम होत असतो.

Sena's tradition of revolt in the western constituency | बंडखोरीची पश्चिम मतदारसंघात सेनेची परंपरा

बंडखोरीची पश्चिम मतदारसंघात सेनेची परंपरा

googlenewsNext
ठळक मुद्देसेनेकडूनच पुनर्वसन : कोणाला तारक, कोणाला मारक? सेनेने २००९चे बंडखोर सुधाकर बडगुजर यांना पक्षात पुन्हा प्रवेश देऊन पावन केले

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्याने निर्माण झालेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आजवरच्या तिन्ही निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांची बंडखोरीची परंपरा कायम ठेवली आहे. यात शिवसेना आघाडीवर असून, यंदाही जागावाटपात भाजपला जागा सुटल्याने सेनेने बंडखोरी करून त्याची प्रचिती दिली आहे. या बंडखोरीपुढे पक्षाच्या नेत्यांनी हात टेकत राजकीय सोयीसाठी पुन्हा बंडखोरांना पक्षात घेऊन नव्याने बंडखोरीची संधी दिली आहे.


२००९ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नाशिक पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. सिडको, अंबडगाव, चुंचाळे, सातपूर या भागाचा मतदारसंघात समावेश असून, कामगार व मध्यमवर्गीयांचा अधिक भरणार आहे. खान्देश व कसमादे येथील मतदारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे त्या त्या भागातील राजकीय वातावरणाचा अप्रत्यक्ष पश्चिम मतदारसंघात परिणाम होत असतो. २००९ मध्ये दोन्ही कॉँग्रेसने आघाडी केली व युतीदेखील या मतदारसंघात भक्कम राहिली. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तिरंगी लढतीचे चित्र होते. कॉँग्रेस आघाडीने नाना महाले यांना, तर भाजपने राहुल आहेर यांना उमेदवारी दिली. मनसेने नितीन भोसले यांना रिंगणात उतरविले. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने डॉ. डी. एल. कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र हा मतदारसंघ भाजपाला सोडल्याचा राग येऊन तत्कालीन सेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी बंडखोरी केली. परिणामी त्याचा फटका भाजपला बसला व मनसेचे नितीन भोसले विजयी झाले. २०१४ मध्ये दोन्ही कॉँगे्रेस व युतीतील सेना-भाजप स्वतंत्र लढल्याने पंचरंगी लढत रंगली. सेनेने २००९चे बंडखोर सुधाकर बडगुजर यांना पक्षात पुन्हा प्रवेश देऊन पावन केले व उमेदवारीही बहाल केली, तर भाजपने उमेदवार बदलून सीमा हिरे यांना उमेदवारी दिली. कॉँग्रेसने माजी महापौर दशरथ पाटील यांना, तर राष्टÑवादीने शिवाजी चुंभळे यांना उमेदवारी दिली. मनसेने आमदार नितीन भोसले यांना रिंगणात उतरविले. माकपाने डॉ. कराड यांना उमेदवारी कायम ठेवली. पंचरंगी लढतीचे चित्र असताना सेनेचे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याचे कारण पुढे करून बंडखोरी केल्याने निवडणुकीची रंगत वाढली. मात्र मत विभागणीचा फायदा भाजपाच्या सीमा हिरे यांना होवून त्या विजयी झाल्या. २०१९ मध्ये त्याच सीमा हिरे यांना सेनेच्या बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असताना जागावाटपात भाजपला जागा सुटल्याचा राग धरून सेनेच्या इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे या इच्छुकांमध्ये सेनेचे गेल्या दोन निवडणुकीतील बंडखोर सुधाकर बडगुजर व डी. जी. सूर्यवंशी यांचाही समावेश आहे. त्यातील सुधाकर बडगुजर यांनी उगारलेला बंडखोरीचा झेंडा माघारीत गुंडाळला व पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे जाहीर केले. मात्र सेनेचे इच्छुकनगरसेवक विलास शिंदे यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली. यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सीमा हिरे यांच्यापुढे बंडखोरीचे आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title: Sena's tradition of revolt in the western constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.