उमेदवारीवरून सेनेत बंडाळी? विधान परिषद : दराडे की सहाणे; गटबाजीमुळे दोन्ही गट सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:11 AM2018-03-23T00:11:38+5:302018-03-23T00:11:38+5:30
नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेत बंड होण्याची चिन्हे आहे.
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेत बंड होण्याची चिन्हे दिसू लागली असून, त्याची सुरुवात एकमेकांच्या भेटीगाठी घेण्यापासून झाली आहे. गत वेळचे पराभूत अॅड. शिवाजी सहाणे यांनी उमेदवारीवर दावा केलेला असतानाच जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासाठी एक गट कमालीचा सक्रिय झाल्यामुळे तूर्त दराडे यांचे पारडे जड दिसू लागल्याने प्रत्यक्षात निवडणुकीच्या तोंडावर पक्षात बंडाळी उफाळणे शक्य वाटू लागले आहे.
येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष या निवडणुकीचा फड रंगणार असला तरी, शिवसेनेत तो आत्तापासूनच उमेदवारीवरून रंगू लागला आहे. गत निवडणुकीत सेनेचे संख्याबळ कमी असतानाही अॅड. शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे जयंत जाधव यांच्याशी काट्याची टक्कर दिली होती. तांत्रिक मुद्द्यावरून सहाणे यांची आमदारकी निसटली. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा विचार यंदाच्या निवडणुकीत होऊन आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी ठाम खात्री सहाणे यांना वाटू लागली आहे व त्यादृष्टीने सहाणे यांनी पक्षांतर्गंत प्रचारही सुरू केला आहे. सोशल माध्यमाचा वापर करून त्यांनी तसे संकेत देणे सुरू केले आहे. दुसरीकडे सेनेतील एका गटाने जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीसाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. मध्यंतरी दराडे यांनी मातोश्रीवर जाऊन पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तशी तयारीही दर्शविल्याचे सांगण्यात येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दराडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून, पक्षाने त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. सहाणे यांना दराडे यांच्या उमेदवारीची कुणकुण लागल्यामुळेच की काय त्यांनी पर्याय म्हणून भाजपाची उमेदवारी करण्याचीही तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे, त्याचाच भाग म्हणून मध्यंतरी सहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.