ज्येष्ठ वकिलांच्या प्रतिमा प्रेरणा देतील
By Admin | Published: October 2, 2015 10:40 PM2015-10-02T22:40:30+5:302015-10-02T22:41:35+5:30
पुखराज बोरा : बार सदस्यांच्या प्रतिमांचे अनावरण
नाशिक : आयुष्यातील निम्म्यापेक्षा अधिक काळ वकिली व्यवसायात घालवून पक्षकारांना न्याय मिळवून देणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ वकिलांच्या प्रतिमा वकिली व्यवसायात उतरू पाहणाऱ्या नवीन वकिलांना प्रेरणादायी ठरतील, असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा यांनी काढले.
नाशिक बार असोसिएशनतर्फे अॅड. रघुनाथ वाघ, नानासाहेब लेले, एम. आर. साठे व मधुकर तोष्णीवाल या चार दिवंगत ज्येष्ठ वकिलांच्या प्रतिमा न्यायालयातील ग्रंथालयात लावण्यात येणार आहे, त्या प्रतिमांचा अनावरण समारंभ शंकराचार्य संकुल येथे झाला, त्यावेळी न्यायमूर्ती बोरा बोलत होते. नाशिक न्यायालयात काही वर्षे मुख्य न्यायधीशपदी काम करताना दिवंगत सर्वच ज्येष्ठ वकिलांसोबत काम करण्याचा अनुभव आपल्याला मिळाला. त्यांच्यातील सचोटी, अभ्यासूपणा व कायद्याचे ज्ञान पाहता, पुढच्या पिढीसाठी त्यांच्या प्रतिमा नेहमीच प्रेरणा देत राहतील असा आपल्याला विश्वास वाटतो, असेही ते म्हणाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष हर्षद निंबाळकर, माजी अध्यक्ष जयंत जायभावे, अविनाश भिडे, बार कौन्सिल इंडियाचे सदस्य सुभाष देशमुख, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना निंबाळकर यांनी, नाशिक बार कौन्सिलने दिवंगत ज्येष्ठ वकिलांच्या प्रतिमांच्या रूपाने त्यांचे कार्य सतत स्मरणात राहण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक बारचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी केले, तर कार्यक्रमाची माहिती जयंत जायभावे यांनी दिली. कार्यक्रमास सर्व वकील वर्ग, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)