ग्रामीण रु ग्णालयात ज्येष्ठांची परवड
By admin | Published: January 10, 2016 11:03 PM2016-01-10T23:03:47+5:302016-01-10T23:05:22+5:30
घोटी : दाखल्यांसाठी होते वणवण
घोटी : येथील ग्रामीण रु ग्णालयात येणाऱ्या वृद्धांची विविध दाखले घेण्यासाठी धडपड सुरू आहे. एका ६५ वर्षीय वृद्ध आजोबांची गाठ पडली. पांढरी दाढी, मळकटलेले कपडे, अनवाणी असलेल्या या वृद्धाशी सहज संवाद साधला असता, ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलतींसाठी आवश्यक असणाऱ्या वयाचा दाखला मिळविण्यासाठी वृद्धांना किती खडतर प्रवास करावा लागतो याची अनुभूती आली.
रेल्वे व परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिल्याने या सर्व सवलतीचा लाभ घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकाच्या वयाच्या दाखल्याची आवश्यकता भासते. हा दाखला मिळविण्यासाठी वृद्ध नागरिकांची ग्रामीण रुग्णालयाकडून बोळवण केली जात असल्याची बाब या आजोबांशी केलेल्या चर्चेतून स्पष्ट झाली.
नाशिक-नगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या आदिवासी पाड्यातून हे आजोबा दोन महिन्यापासून दर आठवड्याला तीस ते पस्तीस किलोमीटर अंतराचा प्रवास करून घोटीतील रु ग्णालयात वयाचा दाखला मिळविण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. लांबलचक रांगेत उभे राहिल्यानंतर नंबर लागल्यानंतर कधी कागदपत्राची अपूर्तता, कधी वैद्यकीय अधीक्षक मीटिंगला गेलेले, तर कधी क्लार्क गैरहजर अशा अनंत कारणामुळे या आजोबांना ‘पुढच्या आठवड्यात या’ अशी उत्तरे ठरलेली असतात. तरीही नाराज न होता हे आजोबा पुन्हा हजर राहतात. चार मुले, सर्व सज्ञान पण उतारवयात मुलांनीही या आजोबांकडे पाठ फिरविलेली. अशा स्थितीत शासनाकडून वृद्धांना मिळणाऱ्या सानुग्रह निधीतून गुजराण होईल या अपेक्षेने त्यांनी तहसील कार्यालयाचे उंबरे झिजविले. मात्र यासाठी दाखल्याची गरज असल्याचे त्यांना समजताच त्यांची धडपड सुरू झाली.
दाखले मिळविल्यानंतर खरा अडसर ठरला तो वयाच्या दाखल्याचा. दोन महिन्यापासून हा दाखला मिळविण्यासाठी या वृद्धाचा खडतर प्रवास सुरू आहे.
घोटीतील ग्रामीण रु ग्णालयात वयाच्या दाखल्यासाठी वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांकडून आर्थिक फीची मागणी करून लूट केली जात असल्याची माहिती एका ज्येष्ठ नागरिकाने दिली. हा दाखला तत्काळ देण्यासाठी शंभर ते पाचशे रुपयांपर्यंतची मागणी होत असल्याची बाब या ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्ट केली. एसटीच्या तिकिटात सवलत मिळण्यासाठी हवा असलेला वयाचा दाखला मिळविण्यासाठी घोटीतील दवाखान्यात चार-पाच चकरा झाल्या. कोणती कागदपत्रे नाहीत, काय करावे लागेल याची कोणीही माहिती देत नसल्याने विनाकारण हेलपाटे होतात. (वार्ताहर)