ज्येष्ठ नेते एन.एम. आव्हाड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:33 PM2018-07-10T23:33:21+5:302018-07-10T23:34:02+5:30

नाशिक : ज्येष्ठ अभियंता, लेखक, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती तसेच क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष निवृत्ती महादेव आव्हाड (७८) यांचे मंगळवारी (दि. १०) सकाळी ७ वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अल्पश: आजाराने निधन झाले.

Senior leader N.M. Avhad passes away | ज्येष्ठ नेते एन.एम. आव्हाड यांचे निधन

ज्येष्ठ नेते एन.एम. आव्हाड यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देश्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता शोकसभेचे आयोजन

नाशिक : ज्येष्ठ अभियंता, लेखक, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती तसेच क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष निवृत्ती महादेव आव्हाड (७८) यांचे मंगळवारी (दि. १०) सकाळी ७ वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अल्पश: आजाराने निधन झाले.
गेल्या तीन दिवसांपासून त्यांना निमोनियासदृश आजार झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. सकाळी मात्र त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आणि प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या गंगापूररोडवरील निवासस्थानी धाव घेतली. दुपारी त्यांचे पार्थिव नाशिकमध्ये त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तसेच नाशिक शिक्षण संस्थेच्या आवारात काहीकाळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, उद्योगपती देवकिसन सारडा, माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, पुंजाभाऊ सांगळे, (पान ५ वर)
निवृत्तीराव डावरे, माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांचा समावेश होता.
रात्री नाशिक अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी आमदार नितीन भोसले, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, भारती पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या शोकसभेत माजी मंत्री तुकाराम दिघोळे तसेच रयतचे भगीरथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्र्पण केली. आव्हाड यांच्या पश्चात पत्नी मनोरमा (वेणूबाई), मुलगे अनिल, संदीप, अ‍ॅड. प्रशांत तसेच सुना व नातवंडे, असा परिवार आहे.
व्यवसायाने स्थापत्य अभियंता असलेले निवृत्ती आव्हाड यांचा राजकीय सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात वावर होता. ‘एनएम’ या टोपण नावाने ते परिचित होते. भुकंप व भूगर्भातील हालचाली हा त्यांचा व्यासंगाचा विषय होता. तसेच साहित्याचीही त्यांना विशेष रुचि होती. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. विविध क्षेत्रांत लीलया वावरणारा हा नेता हरपल्याने मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले. ते मूळचे सिन्नरचे भूमिपुत्र होते. सातवीपर्यंत स्थानिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी नाशिकमधील पेठे हायस्कूल येथे घेतले. एचपीटी व आरवायके महाविद्यालयांत विज्ञान शाखेत महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर १९६५ मध्ये त्यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या जिल्हा परिषदेतच सहा महिने बांधकाम अभियंता म्हणून कामकाज केले. परंतु अवघ्या सहा महिन्यांत शासकीय नोकरी सोडून त्यांनी त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्याचदरम्यान त्यांचा पं. धर्मा पाटील, व्यंकटराव हिरे आणि शांतारामबापू वावरे यांच्याशी संपर्क आला. त्यामुळे ते कॉँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झाले. १९७८ मध्ये त्यांनी सिन्नरमधून सूर्यभान गडाख यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक, तर १९९०-९१ मध्ये (कै.) वसंत पवार यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. १९८० मध्ये सिन्नरमधील दापूर गटातून ते निवडून आले आणि १९८१ ते ९२ असा १२ वर्षांचा कार्यकाळ त्यांनी गाजवला. यात नऊ वर्षे जिल्हा परिषद बांधकाम सभापती म्हणून जिल्हाभरात विविध विकास योजना राबविल्या. विशेषत: पाझर तलावाची केलेली कामे संस्मरणीय ठरली.
राजकारण, समाजकारणा बरोबरच त्यांनी शिक्षणक्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आव्हाड यांचे जन्मगाव असलेल्या ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक समितीच्या अध्यक्षपदापासून ते जनलर बॉडीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. रयत शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्याचप्रमाणे क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा असून, १९६९ पासून ते संस्थेत कार्यरत होते. पुढे २००४ ते २००९ या पंचवार्षिकमध्ये त्यांनी क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर संस्थेच्या शाळा- महाविद्यालयांचे जाळे जिल्हाभरात पसरवले. आर्किटेक्ट व इंजिनिअर असोसिएशन, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ तसेच सावानासह विविध संस्थांशी त्यांचा संबंध होता. आव्हाड हे अभ्यासू लेखकही होते. लातूर व कोयना खोऱ्यांतील भूकंपानंतर विविध वृत्तपत्रांतून त्यांनी लिखाणही केले होते. ‘विज्ञान तरंग’ या विज्ञान पुस्तकाबरोबरच त्यांची वाकडी वाट, निवृत्तिनामा, दूरचे डोंगर यांसह सहा पुस्तके प्रकाशित झाली. ‘सिन्नर भूषण’ या मानाच्या पुरस्काराबरोबरच अखिल भारतीय महानुभाव बाबा गायकवाड साहित्य पुरस्कार , आर्किटेक्ट व इंजिनिअर असोसिएशनचा ‘जीवन गौरव’ पुरस्कारासह विविध संस्थांनी त्यांचा सन्मानही केला होता.

संक्षिप्त परिचय
निवृत्ती महादेव आव्हाड
जन्म : ८ एप्रिल १९४०, ठाणगाव, ता. सिन्नर.
शिक्षण : बी. ई. सिव्हील (पुणे).
भूषविलेली पदे : अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था,
जनरल बॉडी सभासद रयत शिक्षण संस्था,
सभापती, अर्थ व बांधकाम, जिल्हा परिषद,
सभागृह नेता, जिल्हा परिषद
अध्यक्ष, सिमेंट पर्याय समिती, महाराष्टÑ सरकार (१९८२)
सल्लागार अभियंता, महाराष्टÑ राज्य शेती विभाग.
साहित्य : वाकडी वाट, निवृत्तिनामा, दूरचे डोंगर, जनमनातील माणसं, विज्ञान तरंग, चेतना चिंतामणीचा ठाव (पसायदान)
अप्रकाशित पुस्तके- भूकंप, भूकंपाचा पाण्याशी असलेला संबंध, ग्लोबल वार्मिंग व ग्लोबल वॉर्निंग, पाऊस पाणी (मोसमी वारे व पाऊस), निवडक विषय.
पुरस्कार : सिन्नर भूषण पुरस्कार, अखिल भारतीय महानुभाव बाबा गायकवाड साहित्य पुरस्कार, आर्किटेक्ट व इंजिनिअर संस्थेच्या वतीने जीवन गौरव, आर.सी.सी. डिझाइन्ससंदर्भात इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरचा पुरस्कार.
शनिवारी शोकसभा
एन. एम. आव्हाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था तसेच अन्य विविध संस्थांच्या वतीने ही सभा होणार आहे.

Web Title: Senior leader N.M. Avhad passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.