ज्येष्ठ सर्वोदयी नेत्या वासंती सोर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:18+5:302021-07-20T04:12:18+5:30
जुन्या पिढीतील निष्ठावंत कार्यकर्त्या स्वातंत्र्यसैनिक मालतीताई थत्ते व श्रीधर उर्फ काका थत्ते यांच्या कन्या असलेल्या वासंतीताई या महात्मा गांधींजींनी ...
जुन्या पिढीतील निष्ठावंत कार्यकर्त्या स्वातंत्र्यसैनिक मालतीताई थत्ते व श्रीधर उर्फ काका थत्ते यांच्या कन्या असलेल्या वासंतीताई या महात्मा गांधींजींनी स्थापन केलेल्या आणि आचार्य विनोबा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या वर्धा येथील महिलाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या. या ठिकाणी त्यांनी सहा वर्षे अध्यापनाचेही काम केले. विनोबाजींच्या भूदान पदयात्रेतही त्या सहभागी झाल्या होत्या. महात्मा गांधीजींच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभल्याचे त्या अभिमानाने सांगत. त्यांनी आजीवन खादीचा पुरस्कार केला. आयुष्यभर स्वतः काताई केलेल्या खादीचे वस्त्र आणि कपडे वापरण्याचे व्रत त्यांनी जपले होते. सूतकताई मंडळाच्या माध्यमातून त्या अंबर चरखा चालवण्याचे प्रशिक्षणदेखील त्या देत असत. गांधींजींविषयी गैरसमज दूर करणारी अनेक व्याख्याने सुस्पष्ट पुराव्यांसह परखडपणे त्यांनी दिली. गांधी हत्या समज आणि वास्तव तसेच गांधीजी आणि हरिजन त्याचप्रमाणे सर्वोदय विचार, स्त्रीशक्ती जागरण, खादी, गीता अशी अनेक अभ्यासपूर्ण पुस्तकेही त्यांनी लिहिली.
एम. ए. (हिंदी) एम. एड. पदवी घेतल्यानंतर त्यांनी नाशिकच्या बी एड. कॉलेजमध्ये अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले. त्याच कॉलेजच्या प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या. एम. ए.साठी 'गांधी विचार आणि राष्ट्रीय एकात्मता' या विषयाचा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला होता. मुक्त विद्यापीठाचा बी.एड. अभ्यासक्रम, बी.एड. साठी ऑडिओ कॅसेट, बी.एड. प्रश्नपेढी यांची निर्मिती त्यांनी केली होती.
नाशिकच्या महिला हक्क संरक्षण समितीच्या त्यांनी सक्रीय केले.. १९८८ ते ९० या काळात समाजवादी महिला सभेच्या नाशिक शाखेच्या त्या अध्यक्षही होत्या. सर्वोदय प्रेस सर्व्हिसच्या त्या ४ वर्षे सहसंपादक होत्या. त्यांच्या निधनाने सर्वोदयी चळवळीतील कार्यकर्त्यांवर शाेककळा पसरली आहे.
...इन्फो....
लोकमतच्या वतीने केला होता सन्मान
अत्यंत निरलस वृत्तीने काम करणाऱ्या वासंती सोर यांना लाेकमत सखी मंचच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला होेता.
190721\19nsk_20_19072021_13.jpg
ज्येष्ठ सर्वोदयी नेत्या वासंती सेार यांचे निधन