ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते विठोबा मेढे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 08:47 PM2021-02-02T20:47:08+5:302021-02-03T00:18:29+5:30
त्र्यंबकेश्वर : अंबोली येथील ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार विठोबा पाटील मेढे यांचे निधन झाले. ते १०८ वर्षांचे होते.
विठोबा पाटील मेढे यांचा जन्म १० जुलै १९१३ रोजी झाला. कर्मवीर काकासाहेब वाघ, दादासाहेब गायकवाड, ना.ग. गोरे, हरिभाऊ महाले, यादवराव तुंगार, माधवराव गायकवाड यांचे सहकारी असलेले विठोबा मेढे हे जिल्हा लोकल बोर्डाचे ते दोन वेळा सदस्य होते. एक फर्डा आणि स्पष्टवक्ता म्हणून त्यांची ओळख होती.
अंबोली गावच्या ग्रामपंचायतीचे पहिले सरपंचपद त्यांनी भूषविले. पुढे ते अनेक वर्षे सरपंच होते.
अंबोली वि.का. सहकारी सोसायटीचे ते संस्थापक चेअरमन होते. अंबोली गावला लघु पाटबंधारा अर्थात अंबोली धरण त्यांच्याच प्रयत्नातून बांधण्यात आले. पुढे याच धरणाने त्र्यंबकेश्वर शहराची तहान भागविण्यात येत आहे. आंबोलीला प्राथमिक आरोग्य केंद्र, जव्हार-डहाणू रस्ता अंबोली गावावरून करून घेण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले. माजी आमदार पुंजाबाबा गोवर्धने यांच्यासोबत त्यांनी भात लढा यशस्वीपणे लढला. त्यावेळी त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते, तर त्यांच्या पत्नी वेणूताई यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.