ज्येष्ठ आदिवासी सेवक शंकरराव मराठे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 08:55 PM2021-09-26T20:55:11+5:302021-09-26T20:56:27+5:30
अभोणा : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी सेवक व डांग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष शंकरराव सखाराम मराठे उपाख्य अण्णासाहेब यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार सोमवारी (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता येथील गिरणा नदीतीरावर होईल.
अभोणा : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी सेवक व डांग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष शंकरराव सखाराम मराठे उपाख्य अण्णासाहेब यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार सोमवारी (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता येथील गिरणा नदीतीरावर होईल.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब बिडकर यांचे विश्वासू अनुयायी म्हणून अण्णासाहेबांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल सुरू केली. मूळचे धमनार (ता. साक्री) येथील रहिवासी, परंतु बिडकरांच्या सान्निध्यात जंगल कामगार सोसायटीच्या माध्यमातून कळवण तालुक्यातील आदिवासी पश्चिमपट्टा हेच कार्यक्षेत्र राहिले. कळवण तालुका रोजगार हमी योजना समितीचे सदस्य, नाशिक जिल्हा समन्वय व पुनर्विलोकन समितीचे सदस्य, कळवण तालुका वीज मंडळ समन्वय समितीचे सदस्य, नाशिक जिल्हा औद्योगिक सहकार मंडळ सदस्य, कळवण तालुका शेतकी सहकारी संस्था अध्यक्ष व संचालक, कळवण पंचायत समितीचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तालुका ग्रामोद्योग संघाचे संस्थापक अध्यक्ष, डांग सेवा मंडळाचे संचालक, चिटणीस व उपाध्यक्ष, वसंतदादा सहकारी साखर कारखाना विठेवाडीचे मुख्य प्रवर्तक, मराठा समाज कल्याणकारी संस्थेचे संस्थापक चिटणीस अशा विविध पदांवर कार्यरत राहून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा निर्माण केला.
तत्कालीन आदिवासी विकासमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते आदिवासी सेवक पुरस्कार तसेच डांग सेवा मंडळाच्या कर्मवीर दादासाहेब बिडकर आदर्श कार्यकर्ता या पुरस्काराने ते सन्मानित झालेत. नाशिक जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता विजय मराठे, नंदकुमार मराठे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
(२६ शंकरराव मराठे)