निवडणुकीच्या तोंडावर सेनेची सभासद नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 06:28 PM2019-01-07T18:28:48+5:302019-01-07T18:29:06+5:30
यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी, सर्वात कसोटीचा प्रसंग शिवसेनेवर आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाबरोबर युती न केल्यास स्वबळावर लढावे लागणार आहे. अशा परिस्थितीत सारी भिस्त शिवसैनिकांवर राहणार आहे. मित्रपक्षाबरोबरच विरोधकांशी दोन हात करावे लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने देशपातळीवर सभासद नोंदणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, सन २०१८ ते २०२० पर्यंत सभासदत्व बहाल करणाऱ्या या नोंदणीचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून, नाशिक जिल्ह्यासाठी यंदा सुमारे तीन लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर सभासद नोंदणी होणार असल्यामुळे यंदा विक्रमी सभासदत्व होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी, सर्वात कसोटीचा प्रसंग शिवसेनेवर आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाबरोबर युती न केल्यास स्वबळावर लढावे लागणार आहे. अशा परिस्थितीत सारी भिस्त शिवसैनिकांवर राहणार आहे. मित्रपक्षाबरोबरच विरोधकांशी दोन हात करावे लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर लढून राज्यातील दुसºया क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळविले होते. चालू वर्षीही लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे त्यापार्श्वभूमीवर राबविल्या जात असलेल्या सभासद मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिक जिल्ह्यात या मोहिमेचा लवकरच शुभारंभ केला जाणार असल्याने सुमारे तीन लाखांहून अधिक सभासद अर्ज सेना भवनातून पाठविण्यात आले आहेत. संपर्क प्रमुखांच्या आगामी नाशिक भेटीत या मोहिमेचा शुभारंभ व प्रत्येक तालुका, पदाधिकाºयांना सभासद नोंदविण्याबाबत ‘टार्गेट’ दिले जाणार आहे. या सभासद अर्जाची वैधता दोन वर्षांपर्यंत आहे. ग्रामीण भागात तालुका प्रमुखांना त्याची जबाबदारी तर शहरात प्रत्येक प्रभागनिहाय सभासद नोंदणीसाठी शाखा प्रमुख व प्रभागाच्या नगरसेवक यात महत्त्वाची भूमिका बजावतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार व इच्छुकांकडून सभासद नोंदणीला अधिक महत्त्व दिले जाणार आहे.
चौकट===
दोन रुपयात सभासदत्व
शिवसेनेचे सभासदत्व नोंदणी शुल्क दोन रुपये असले तरी, सभासदत्व अर्जाचे शुल्क पक्ष पदाधिका-यांकडूनच भरले जाते. पक्ष कार्यालयात अर्जाचे पैसे अदा करून अर्ज दिले जाते. या अर्जात सभासद होऊ इच्छिणाºयाची व्यक्तिगत माहिती नमूद करण्याबरोबरच त्याचा मतदार संघ, मतदान केंद्र क्रमांक, शिक्षण, छंद, व्यवसाय, नोकरी याबाबतही विचारणा करण्यात आली आहे.