कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:16+5:302021-05-08T04:15:16+5:30
नाशिक : कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचे वेळापत्रक बिघडले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, त्यांना दुसरा ...
नाशिक : कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचे वेळापत्रक बिघडले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, त्यांना दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे दरराेज वेगवेगळ्या केंद्रांवर डोससाठी भटकंती करावी लागत आहे. ही स्थिती टाळण्यासाठी महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांना अग्रक्रमाने दुसरा डाेस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक गुरूमित बग्गा व विमल पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर आधी कोरोना योद्धे, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स आणि नंतर साठ वर्षांवरील ज्येष्ठ तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांना लस देण्यात आली. परंतु, नंतर १ मेपासून १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देणे सुरू झाल्यानंतर अडचण झाली असून, ज्या नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे, त्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस देणे अपेक्षित असतानाही तसे झालेले नाही. सध्या नागरिकांना दुसऱ्या डाेस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांना भेटी द्याव्या लागत आहेत. १८ ते ४५ वर्षादरम्यानच्या युवावर्गाला सध्या कोव्हॅक्सिन लस मिळते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून तातडीने ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डाेस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बग्गा व पाटील यांनी केली आहे.