लसीकरणात अद्यापही ज्येष्ठांचीच आघाडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:14 AM2021-04-08T04:14:57+5:302021-04-08T04:14:57+5:30
नाशिक : जिल्ह्यात लसीकरणाला प्रारंभ होवून अडीच महिन्यांहून अधिक काळ तर ४५ वर्षांवरील कोमार्बिड रुग्णांच्या लसीकरणाला एक महिन्याहून अधिक ...
नाशिक : जिल्ह्यात लसीकरणाला प्रारंभ होवून अडीच महिन्यांहून अधिक काळ तर ४५ वर्षांवरील कोमार्बिड रुग्णांच्या लसीकरणाला एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. तर ४५ वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही एक आठवड्यापासून लसीकरण देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. ४५ वर्षांवरील लसीकरणाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अद्यापही एकूण लसीकरणाच्या पहिल्या डोसमध्ये ज्येष्ठ नागरिकांचेच प्रमाण दुपटीहून अधिक आहे. केवळ दुसऱ्या डोसमध्ये ज्येष्ठ नागरिक केवळ काहीसेच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि करोना योद्ध्यांचं लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर मार्च महिन्यातच कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास प्रारंभ झाला. तसेच त्यांच्यासमवेत ४५ वर्षांवरील विविध व्याधींनी ग्रस्त नागरिकांनादेखील लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे ४५ ते ५९ वर्षांच्या परंतु, गंभीर आजारानं त्रस्त असलेल्या व्यक्तींनाही लस उपलब्ध होऊ शकली. मात्र, गत महिन्यापासून लस उपलब्ध असूनही अद्यापही ४५ वर्षांवरील नागरिकांनी तितकासा उत्साह दाखविलेला नाही. त्यापेक्षा ज्येष्ठांनीच त्यांच्या लसीकरणातील सातत्य कायम राखल्याने अद्याप तरी ज्येष्ठ नागरिकांचेच लसीकरणाचे प्रमाण अधक आहे.
इन्फो
खासगी रुग्णालयांमध्येही वेग
नियमानुसार लसीकरणासाठी नाव नोंदविणारा व्यक्ती कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणती लस घ्यायची याची निवड करू शकणार नाही. लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल, ती लस नागरिकांना घ्यावी लागेल. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारी रुग्णालयांशिवाय खासगी रुग्णालयांनाही सहभागी करून घेण्यात आले असल्याने तिथेही लसीकरणाला वेग मिळाला आहे. परंतु, जिल्ह्यातील काही मोजक्याच रुग्णालयांना लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याने त्यांचा वेग नियंत्रित आहे. राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येतो. लसी तसेच सिरिंजेस शीतसाखळी उपकरणे व अनुदान केंद्र शासनाकडून पुरविण्यात येते.
इन्फो
लाभार्थिंची नोंद आणि मोबाईलवर प्रमाणपत्र
लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे दिलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रकाचा वापर केला जातो. आरोग्य संस्था व बाह्य संपर्काच्या ठिकाणी ठरावीक दिवशी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते. लाभार्थिंपर्यंत लस पोहोचविण्यासाठी लसीची वाहतूक करताना शितसाखळीची गुणवत्ता अबाधित ठेवली जाते. आरोग्य व कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या लाभार्थिंची नोंद लसीकरण रजिस्टरमध्ये केली जाते. तसेच लसीकरण नोंदीनंतर संबंधित व्यक्तीच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लसीकरण केल्याचे प्रमाणपत्रदेखील तत्काळ पोहोचते. शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरणाच्या सेवा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून लाभार्थिंना विनामूल्य पुरविल्या जातात. लसींची शितसाखळी अबाधित ठेवण्यासाठी आईसलाईन रेफ्रीजरेटर, डिपफ्रीजर, कोल्ड बॉक्स व्हॅक्सीन कॅरिअर, आईस पॅक, वॉक इन कुलर आणि फ्रीजर्स अशा उपकरणांचा वापर केला जातो.
इन्फो
आकड्यात लसीकरण
६० वर्षांपुढील लसीकरण संख्या - १ लाख ४० हजार ५४४ ( पहिला डोस),
४५ वर्षांपुढील लसीकरण संख्या - ७२ हजार ६६१ (पहिला डोस),
आरोग्य कर्मचारी लसीकरण संख्या - १ लाख २ हजार ४८८
आरोग्य कर्मचाऱ्यांसह एकूण संख्या - ३ लाख १५ हजार ६९३ (पहिला डोस)
६० वर्षांपुढील लसीकरण संख्या - १ हजार ४५६ ( दुसरा डोस)
४५ वर्षांपुढील लसीकरण संख्या - १ हजार ३३६ (दुसरा डोस)
आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या - ३४ हजार ६९४ (दुसरा डोस)
आरोग्य कर्मचाऱ्यांसह एकूण संख्या - ३७ हजार ४८६ (दुसरा डोस)
-----------------------
ही डमी आहे.