जिल्हा रुग्णालयात बेवारस गर्भ सापडल्याने खळबळ
By admin | Published: February 1, 2015 12:04 AM2015-02-01T00:04:51+5:302015-02-01T00:05:05+5:30
तर्कवितर्क : सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिन्यामध्ये सुमारे चार महिन्यांचे अर्भक बेवारस अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली़ हे अर्भक या ठिकाणी कसे आले याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात असून, याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक काय निर्णय घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे़
जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत रुग्णांसाठी सुमारे दहा स्वतंत्र कक्ष आहेत़ दुपारी चार वाजेच्या सुमारास येथील शिपाई जिन्याचे कुलूप लावण्यासाठी जात असताना जिन्यामध्येच साधारणत: चार महिन्यांचे अर्भक फेकलेल्या अवस्थेत आढळून आले़ यानंतर संपूर्ण जिल्हा रुग्णालयात अर्भक सापडल्याची वार्ता कर्णोपकर्णी पसरल्याने या ठिकाणी एकच गर्दी झाली़ यावेळी उपस्थितांमध्ये जिल्हा रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था असताना जिन्याच्या कोपऱ्यात हा गर्भ आलाच कसा, अशी चर्चा सुरू झाली़
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी एखाद्या महिलेचा गर्भपात केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनीच तर हे या ठिकाणी टाकले नसावेना अशीही चर्चा सुरू होती़ या घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांना समजताच त्यांनी तत्काळ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेत या प्रकरणाची माहिती घेतली़ मात्र हे अर्भक या ठिकाणी कसे आले याबाबत कोणीही काही सांगू शकले नाही़
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाची सुरक्षाव्यवस्था व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून या ठिकाणी बेवारस सापडलेल्या अर्भकामुळे विविध प्रश्न निर्माण झाले असून, याबाबत डॉ़ माले काय निर्णय घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)