चायनीज विक्रेत्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 01:33 AM2022-06-13T01:33:34+5:302022-06-13T01:34:03+5:30
शरणपूर पालिका बाजार येथील तिबेटियन मार्केट परिसरात चायना गेट नावाने चायनीज विक्रीची हातगाडी लावून व्यवसाय करणारे कैलास बाबूराव साबळे (४५, रा. हेडगेवार चौक, सिडको) यांचा रविवारी (दि.१२) राहत्या घरातच संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेहाचाही पंचनामा केला.
सिडको : शरणपूर पालिका बाजार येथील तिबेटियन मार्केट परिसरात चायना गेट नावाने चायनीज विक्रीची हातगाडी लावून व्यवसाय करणारे कैलास बाबूराव साबळे (४५, रा. हेडगेवार चौक, सिडको) यांचा रविवारी (दि.१२) राहत्या घरातच संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेहाचाही पंचनामा केला. दरम्यान, मृतदेहाच्या डोक्यावर व पायाच्या बाजूला काही जखमाही पोलिसांना आढळून आल्याने हा घातपात आहे का? या दिशेने अंबड पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही संशयितांवर गुन्हा दाखल झालेला नव्हता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साबळे हा तिबेटियन मार्केट येथे चायनीज खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत होता. त्यास मद्यप्राशनाचे व्यसनही होते. शनिरात्री रात्री बारा वाजेच्या सुमारास तो घरी आला. बायकोसोबत बोलल्यानंतर तो पुन्हा घरातून निघून गेला. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्याचा मित्र पिंटू गायकवाड याने कैलास याला घरी आणून सोडले. त्यावेळेस त्याच्या डोक्यास जखम व हाता पायावर मारहाणीचे व्रण दिसत होते. त्याने स्वतःच्या हाताने डोक्यातील जखमेत हळद भरली आणि पत्नीसोबत बोललाही. यादरम्यान, त्याच्या पत्नीने कैलासला दूध पिण्यासाठी दिले व त्याने दूधही प्यायले. सकाळी सात वाजता पत्नी निशा हिने कैलासला उठविले असता त्याच्या शरीराची कुठलीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्यांनी तत्काळ कैलास यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान, हा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण परिसरात कैलासच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलीस निशा साबळे, पिंटू गायकवाड यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
तसेच कैलासच्या सोबत काही घातपात झाला का, याबाबतचे पुरावे व माहितीही संकलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, त्यास मध्यरात्री मारहाण देखील करण्यात आल्याची परिसरात चर्चा होत होती. या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.