एम.डी तरुण डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:20 AM2021-08-19T04:20:11+5:302021-08-19T04:20:11+5:30

पवार वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी स्त्री रोग विद्या शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे डॉक्टर स्वप्निल शिंदे हे मंगळवारी सकाळी ...

Sensation by the suspicious death of M.D. young doctor | एम.डी तरुण डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

एम.डी तरुण डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

Next

पवार वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी स्त्री रोग विद्या शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे डॉक्टर स्वप्निल शिंदे हे मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजला लागून असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळील प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत आढळून आले होते त्यांना तत्काळ उपचारासाठी मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. गेल्या एक दीड वर्षापासून शिंदे आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्यासाठी बीड येथून दाखल झाले होते. त्यांच्या अचानकपणे झालेल्या मृत्यूने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. दरम्यान, शिंदे यांचा ‘व्हिसेरा’ अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण बुधवारपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१७) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपल्या मुलाचा घातपात झाला असल्याची तक्रार मयत स्वप्निल यांच्या वडिलांनी अर्जाद्वारे आडगाव पोलिसांकडे केली आहे.

--इन्फो--

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

शिंदे यांचा मृतदेह नातेवाईकांनी बुधवारी उशिरापर्यंत ताब्यात घेतलेला नव्हता. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याशिवाय स्वप्निलचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. शिंदे यांनी आत्महत्या केली? की त्यांचा घातपात झाला? याबाबत कोणतेही स्पष्टोक्ती नसून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी सांगितले.

--इन्फो--

स्वप्निल रॅगिंगचा बळी?

स्वप्निल यांची त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील दोन महिला डॉक्टरांकडून रॅगिंग केले जात असल्याची महाविद्यालयाच्या कॅम्पस वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, स्वप्निल यांचे वडिलांनी दिलेल्या तक्रार अर्जात मात्र, दोन महिला डॉक्टरांच्या नावांचा उल्लेख केलेला असून या दोघींपासून माझ्या जीविताला धोका असल्याचे स्वप्निल नेहमी सांगत होता, असेही म्हटले आहे. या दोन्ही डॉक्टरांसोबत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि दुसऱ्या एका महिला डॉक्टराने मिळून संगनमत करून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

---इन्फो---

स्वप्निलकडे आढळली सुसाईड नोट

स्वप्निलकडे आढळलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याचे रॅगिंग करणाऱ्या मुलींची नावे स्पष्टपणे लिहिलेली असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मुलींच्या छळाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केली असावी असाही संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

--कोट--

मृत स्वप्निलच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. स्वप्निलवर ताण-तणावाविरुद्ध संघर्ष करत होता त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. त्याने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी यापूर्वी कधीही रॅगिंगबाबतची कोणतीही तक्रार केलेली नाही. फेब्रुवारीपासून तो पाच महिने बीड येथील त्याच्या घरीच राहत होता. जुलैपासून स्वप्निलसोबत त्याच्या आईदेखील कॅम्पसमधील वसतिगृहात राहत होत्या. मंगळवारी सकाळी तो चेंजिंग रूमच्या टॉयलेटमध्ये पडला होता. वॉर्डबॉय यांच्या मदतीने त्याला बाहेर काढत तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले; मात्र रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- डॉ. मृणाल पाटील, अधिष्ठाता, डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज

Web Title: Sensation by the suspicious death of M.D. young doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.