पवार यांच्या दौऱ्यातून पुन्हा अनुभवास आली संवेदनशीलता!

By किरण अग्रवाल | Published: July 25, 2020 10:53 PM2020-07-25T22:53:40+5:302020-07-26T00:26:29+5:30

नाशकात शरद पवार यांचा दौरा म्हटला की जणू उत्सवच असतो. पण यंदा पक्षीय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. त्यासाठी गर्दी करू नका म्हणून पक्षातर्फे स्पष्ट संदेशही देण्यात आले होते. फिजिकल डिस्टन्स ठेवत त्यांनी राज्यातील मंत्र्यांसह कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत सर्वपक्षीयांनी सहभागी होणे अपेक्षित असताना भाजपच्या खासदार - आमदार आदी लोकप्रतिनिधींंनी मात्र पक्षीय भूमिकेतून बहिष्कार घातला. त्यामुळे संकटातील राजकारणाची संधी उघड होऊन गेली.

Sensitivity re-experienced from Pawar's visit! | पवार यांच्या दौऱ्यातून पुन्हा अनुभवास आली संवेदनशीलता!

पवार यांच्या दौऱ्यातून पुन्हा अनुभवास आली संवेदनशीलता!

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपच्या लोकप्रतिनिधींनी संधी सोडली, सत्ताधारी प्रतिनिधींनी ती घेत यंत्रणेतील दोषाचा पाढा वाचलाराजकारण केल्याशिवाय राहावत नाही हे पवार यांच्या नाशिक दौºयावर बहिष्कार घालणाºया भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी दाखवून दिले. भाजपच्या प्रदेश चिटणीस प्रा. देवयानी फरांदे यांनी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आजवरच्या बैठकीत टाळण्यात आल्याबद्दल नाराजी दर्शवली.

सारांश

नेतृत्व कुठलेही असो आणि ते सत्तेतही असो अगर नसो, असेच प्रस्थापित होत नाही किंवा उजळून निघत नाही, त्यासाठी सातत्याने लोकांमध्ये राहून त्यांच्या सुखदु:खाशी एकरूपता साधावी लागते. आपल्या मर्जीने व सवडीने राजकारण करण्याचे दिवस कधीच गेले, आता त्या त्यावेळीच जनभावनांची दखल घ्यावी लागते. शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व हे नेमके जाणून आहे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील त्यांच्या नाशिक दौºयाने ते पुन्हा अधोरेखित झालेले दिसून आले.

नाशकातील कोरोनाग्रस्तांचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण चिंतादायी ठरले आहे, अर्थात चाचण्या वाढल्याने बाधितांची संख्या अधिक आढळून येत आहे हे एका दृष्टीने योग्यच होत आहे, कारण या रुग्णांच्या ट्रेसिंगमुळे पुढे होणारे संक्रमण रोखणे शक्य होत आहे. शिवाय बाधितांची संख्या वाढलेली दिसत असली तरी उपचाराअंती बरे होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे हे दिलासादायक असेच म्हणायला हवे. मागील जून महिन्यात कोरोनामुक्तीची जी टक्केवारी जिल्ह्यात ५६ व नाशकात ६१ टक्के होती ती जुलैमध्ये वाढून अनुक्रमे सुमारे ७० व ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे. ज्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत आहे अशा अतिगंभीर म्हणवल्या जाणाºया रुग्णांचे प्रमाण हे केवळ ०.८ टक्के म्हणजे १ टक्क्यापेक्षाही कमी आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही; गरज आहे ती केवळ सावधानतेची, विश्वासाची व या संकटातून बाहेर पडू याबद्दलच्या भरवशाची. यासाठी परिश्रम घेणाºया यंत्रणा सक्षमतेने व समन्वयाने काम करीत आहेत आणि त्याच बरोबर त्यात आढळून येणाºया त्रुटी दूर केल्या जात आहेत हे दिसून येणे गरजेचे आहे. याचदृष्टीने शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ व निर्णायक क्षमता असणाºया नेत्यांच्या दौºयाकडे व आढाव्यांकडे बघता येणारे आहे.

नाशिक व पवार यांच्या संदर्भाने बोलायचे झाल्यास नाशिकवर पवार यांचे विशेष लक्ष व प्रेम असल्याचे सर्वविदित आहे. त्यामुळे गेल्यावेळी अवकाळी पावसाने जेव्हा जिल्ह्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान घडून आले त्यावेळी पवार नाशकात धावून आलेले व भरपावसात फिरलेले पहावयास मिळाले आणि आता या कोरोनाकाळातही ते सर्वप्रथम नाशकात आले. मतदारांप्रतिच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या प्रति असलेली पवार यांची संवेदनशीलता व त्यांचे जाणतेपण यातून प्रत्ययास यावे. नेतृत्व असेच नाही प्रस्थापित होत हे जे काही प्रारंभी म्हटले आहे ते याच संदर्भाने. पण अशातही काही जणांना राजकारण केल्याशिवाय राहावत नाही हे पवार यांच्या नाशिक दौºयावर बहिष्कार घालणाºया भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी दाखवून दिले. किंबहुना लोकांच्या प्रश्नांपेक्षाही संबंधिताना त्यांचे राजकारणच किती प्यारे आहे हेच यातून निदर्शनास आले.

मुळात फडणवीस मुख्यमंत्री असताना काढल्या गेलेल्या परिपत्रकाचा विसर पडल्याने त्याची आठवण विद्यमान सरकारने करून दिल्याच्या रागापोटी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी हा बहिष्कार घातला. पण ही त्यासाठीची वेळ नव्हती. पवार यांच्याकडे केवळ खासदार म्हणून बघता येणारे नाही, तर आपत्तीच्या स्थितीत यंत्रणा राबविण्याबद्दल व उपाययोजनांबद्दलची त्यांची हातोटी खुद्द भाजपसाठीच प्रात:स्मरणीय असलेल्या नरेंद्र मोदी यांनीही यापूर्वी मान्य केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात पक्षभेद बाजूस ठेवून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना घेता आली असती. बरे, यांचा पक्षीय अभिनिवेशही इतका, की नाशिकचे महापौरही या बैठकीस गेले नाहीत. त्यामुळे सत्तारूढ पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीत संकटाशी लढण्याबाबत यंत्रणांच्या उणिवांवर बोट ठेवताना दिसून आले आणि विरोधक मात्र गैरहजर राहिल्याने त्यांची दूरस्थता उघड होऊन जाणे स्वाभाविक ठरले.

...येथे मात्र बोलावूनही गेले नाहीत
पवार यांच्या बैठकीवर बहिष्कार घालताना भाजपच्या प्रदेश चिटणीस प्रा. देवयानी फरांदे यांनी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आजवरच्या बैठकीत टाळण्यात आल्याबद्दल नाराजी दर्शवली. पण पवार यांच्या बैठकीस बोलावले जाऊनही त्यांनी जाणे टाळले. वस्तुत: या बैठकीस राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आदी मान्यवरही उपस्थित होते. त्यामुळे विरोधकांनाही त्यांच्या सूचना मांडण्याची संधी होती. पण ती घेतली गेली नाही.

Web Title: Sensitivity re-experienced from Pawar's visit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.