निर्बंधात शिथिलता देण्याचा प्रस्ताव पाठविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 01:44 AM2021-07-24T01:44:51+5:302021-07-24T01:45:56+5:30
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्याने शनिवार किंवा रविवार यापैकी एक दिवस दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी किंवा दुकानांची वेळ एक तासाने वाढवून मिळावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविला असून त्यांच्या परवानगीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्याने शनिवार किंवा रविवार यापैकी एक दिवस दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी किंवा दुकानांची वेळ एक तासाने वाढवून मिळावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविला असून त्यांच्या परवानगीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मनपा आयुक्त कैलास जाधव उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यात वीकेण्ड लॉकडाऊन सुरू असल्याने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दुकाने बंद ठेवली जात आहेत. यापैकी एक दिवस दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी किंवा बाजारपेठेतील दुकानांची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत तरी वाढवून द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधात शिथिलता देण्याचा अधिकार हा केवळ मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्सला असल्याने त्यांच्या निर्णयावरच सर्वकाही अवलंबून असणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर यााबाबतचा निर्णय घेता येणार नसल्याचेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
कोरोना नियंत्रणात येत असल्याने सध्या सुरू असलेल्या निर्बंधात शिथिलता मिळावी, अशी अनेक व्यापारी संघटनांची मागणी असल्याने पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, तूर्तास जिल्ह्यातील निर्बंध कायम असून शासनाच्या निर्णयावर पुढील निर्णय होणार आहे.
--इन्फो--
लष्कर भरतीला परवानगी
देवळाली कॅम्पला होणाऱ्या वायुदलाच्या भरती प्रक्रियेसाठी देशभरातून सुमारे अडीच हजार उमेदवार नाशिकमध्ये येणार असल्याने या भरतीला परवानगी मिळावी, असे पत्र वायुदलातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. त्यांच्या भरतीला परवानगी देण्यात आलेली आहे. अर्थात कोरोना नियंत्रणाचे सर्व निर्बंध पाळून होणाऱ्या लष्कराच्या कोणत्याही प्रकारच्या भरतीला परवानगी दिली जाईल, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
--इन्फो--
नाशिकनगरी चित्रीकरणाला उपलब्ध
कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याने नाशिकमध्ये चित्रीकरणाला परवानगी देखील असेल. मुंबईकरांना इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक जवळ असल्याने नाशिकमध्ये चित्रीकरणाचा त्यांचा कल असतो. यामागे अर्थचक्राला गती देण्याचा देखील मुद्दा असल्याचे भुजबळ म्हणाले. चित्रीकरणामुळे स्थानिक रोजगारालाही चालना मिळू शकते. दरम्यान, कोरोना रुग्ण नसलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ३३५ शाळा सध्या सुरू असून या शाळा सुरळीत सुरू आहेत. खासगी क्लासेसला अजून परवानगी देण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
--इन्फो--
ऑक्सिजन क्षमता वाढविणार
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. ३१ ऑगस्टपर्यंत ऑक्सिजन क्षमता वाढविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्याला १३७ मेट्रिक टन इतकी दिवसाची गरज होती. पुढील काळात ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.