कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार
By Suyog.joshi | Published: December 9, 2023 03:32 PM2023-12-09T15:32:40+5:302023-12-09T15:33:34+5:30
नाशिक शहरात २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने त्या अनुषंगाने महापालिकेकडून सिंहस्थ आराखड्याचे सादर करण्याचे काम सुरु आहे.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार झाला असून नगररचना विभागाकडून भुसंपादनासाठी किती खर्च लागणार यावर मंथन सुरु आहे. या विभागाकडून माहिती मिळताच आयुक्तासमोर सिहंस्थ आराखडा सादर करण्यात येणार आहे. सिंहस्थ आराखडा अकरा ते बारा हजार कोटीच्या घरात जाणार आहे.
नाशिक शहरात २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने त्या अनुषंगाने महापालिकेकडून सिंहस्थ आराखड्याचे सादर करण्याचे काम सुरु आहे. सर्व विभागांचा मिळून प्रारुप आराखडा आयुक्तांसमोर सादर करावयाचा आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून विविध विभागांमार्फत सिंहस्थात केल्या जाणाऱ्या कामांच्या प्रस्तावांची जुळवाजुळव सुरू आहे. या सर्व विभागांचा एकत्रित प्रारूप सिंहस्थ आराखडा तयार होणार आहे. सिंहस्थात साधू-महंतांसह सुमारे एक कोटी भाविक नाशिकला येण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत ५४ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित सुमारे तीनशे एकर जागा भाडेतत्त्वावर अधिग्रहीत केली जाणार आहे.
साधुग्राममध्ये रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आदी मूलभूत सुविधांसह आरोग्य व वैद्यकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर सिंहस्थानिमित्त शहरातील बाह्य, अंतर्गत रिंगरोड विकसित केले जाणार आहे. गंगापूर व दारणा धराणातून थेट पाइपलाइन योजनेसह नव्याने विकसीत झालेल्या भागात नवीन जलावाहिन्या टाकणे, अग्निश्मन केद्र, नवीन बंब व अग्निशमन साहित्याची खरेदी केली जाणार आहे. यापूर्वी नाशिकमध्ये २०१५ झालेल्या सिंहस्थ आराखडा तेवीसशे कोटीपर्यत होता. यात तेराशे कोटी राज्यशासन तर हजार कोटी महापालिकेने देत शहरात विविध कामे करण्यात आली होती. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थात हा आराखडा पाच ते सहा पटीने वाढून बारा हजार कोटींपर्यत जाण्याची शक्यता आहे.