पांढुर्ली, साकूर उपकेंद्रासाठी स्वतंत्र वीजवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:48+5:302021-05-18T04:14:48+5:30
सिन्नर :तालुक्याच्या पश्चिम भागातील ठाणगाव, वडगाव सिन्नर, पांढुर्ली व टाकेद गटातील साकूर या वीज उपकेंद्रांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी स्वतंत्र ...
सिन्नर :तालुक्याच्या पश्चिम भागातील ठाणगाव, वडगाव सिन्नर, पांढुर्ली व टाकेद गटातील साकूर या वीज उपकेंद्रांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी स्वतंत्र वीज वाहिन्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
खापराळे येथे १३२ केव्ही मतदारसंघातील चार वीज उपकेंद्रांसाठी मंजूर झालेल्या २ कोटी ९० लाख रुपयांच्या नवीन वीजवाहिनी टाकण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पं. स. सदस्य तातू जगताप, ठाणगावचे सरपंच ए. टी. शिंदे, पाडळीचे माजी सरपंच अशोक रेवगडे, कोनांबेचे माजी सरपंच संजय डावरे, दीपक जगताप, दत्ता पगार, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, उपकार्यकारी अभियंता सचिन पवार, वडगाव सिन्नरचे इप्पर आदी उपस्थित होते.
सिन्नरच्या तीन व टाकेद गटातील एका उपकेंद्रांतर्गत गावातील कृषी ग्राहक वारंवार खंडित होत असलेल्या विजेमुळे त्रस्त झाले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी खापराळे येथील १३२ केव्ही केंद्रावरून पांढुर्ली व साकूर उपकेंद्रांसाठी ३३ केव्ही वाहिनी टाकण्यात येणार आहे. तर सिन्नर येथून वडगाव व ठाणगाव येथे गेलेल्या वीजवाहिनीवरील भार कमी करण्यासाठी वडगाव उपकेंद्राला स्वतंत्र वीजपुरवठ्यासाठी खापराळे येथून स्वतंत्र वाहिनीसाठी ४० लाख रुपये निधी मंजूर करून आणला. त्यामुळे सुरू करण्यात आलेली ही कामे पूर्ण झाल्यानंतर कृषीसह विविध प्रकारच्या १० हजारांहून अधिक ग्राहकांची वारंवार खंडित होणाऱ्या विजेपासून शेतकऱ्यांची सुटका होणार असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.
-------------------
ठाणगाव, वडगाव उपकेंद्रांना दुहेरी वीजपुरवठा
सध्या सिन्नरवरून ३३ केव्ही वाहिनीद्वारे ठाणगाव वीज उपकेंद्रासाठी वीजपुरवठा होत आहे. याच वाहिनीला वडगाव उपकेंद्राची वाहिनी जोडलेली आहे;मात्र वाढता वीजभार व जुनी वाहिनी यामुळे अनेकदा पुरवठा खंडित होत असतो. या वाहिनीवरील वडगाव उपकेंद्राचा भार कमी करून स्वतंत्र वीजवाहिनी टाकण्यात येणार आहे. सिन्नरहून ठाणगाव व खापराळेहून वडगावला गेलेली वीजवाहिनी वडगावजवळ एकमेकींना लिंक करण्यात येणार आहे. या केंद्रांना दुहेरी वीजपुरवठा होणार आहे.