नाशकातील सराफ बाजार पाण्याखाली ;जोरदार पावसामुळे पूरस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 07:02 PM2019-10-06T19:02:30+5:302019-10-06T19:10:14+5:30
नाशिक : गेल्या दोन महिन्यापूर्वी रविवार, दि.४ ऑगस्टला गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे विस्कळीत झालेल्या सराफ बाजाराला पुन्हा रविवारच्याच ...
नाशिक : गेल्या दोन महिन्यापूर्वी रविवार, दि.४ ऑगस्टला गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे विस्कळीत झालेल्या सराफ बाजाराला पुन्हा रविवारच्याच दिवशी फटका बसला. शहरात सुमारे दिडतास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्णशहर जलमय होऊन सराफ बाजारातील सखल भागात दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सराफ व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. शहरातील पाण्याचा प्रवाह एकवटून सराफ बाजारात येत असल्याने या भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.
शहरात रविवारी (दि.६) अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील सराफ व्यावसायिकांसह, भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांना त्यांचे साहित्य जमा करण्याची संधीही मिळाली नाही. तर परिसरातील सराफांच्या पेढ्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाºया पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व्यावसायिकांकडून सातत्याने पूररेषा शिथिल करून बाजार पेठ विकसित करण्यासाठी महापालिकेने परवानगी देण्याची मागणी केली जात असतानाही व्यावसायिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात जोरदार पाऊस झाल्यास त्याचे पडसाद नेहमीच सराफ बाजारात उमटत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील जुनी व ऐतिहासिक वारसा असलेल्या या बाजारातील व्यावसायिकांमध्ये बाजारपेठ विकसित करण्याची क्षमता आहे. परंतु, केवळ पूररेषेच्या कारणामुळे पैसा असूनही सराफ व्यावसायिकांना त्यांच्या पेढ्या विकसित करता येत नाही. प्रत्येक वेळी येणाºया पुराच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी येणाऱ्या प्रशासनाकडून पुराचे साचलेले पाणी गृहीत धरून पूररेषा निश्चित केली जाते. त्यामुळे सराफबाजारच पूर रेषेत आल्याने येथील व्यावसायिकांना येथील पेढ्या विकसित करता येत नाही. मात्र यासाठी महापालिकेचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून होत आहे