रिक्षा-मोटारीच्या अपघातात एक गंभीर
By admin | Published: June 30, 2015 12:01 AM2015-06-30T00:01:57+5:302015-06-30T00:02:35+5:30
रिक्षा-मोटारीच्या अपघातात एक गंभीर
नाशिक : सीबीएसकडून मुंबईनाका मार्गे सिडकोकडे जाणारी रिक्षा व मोटार यांच्यात कालिका देवी मंदिरासमोर रात्री दहा वाजेच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात रिक्षामधील कानिफनाथ बबन जाधव (३६) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने रिक्षा उलटली नाही त्यामुळे अन्य प्रवासी बालंबाल बचावले. सिडकोकडे जाणारी रिक्षा (एमएच १५, झेड ५४७१) मध्ये किमान सहा ते सात प्रवासी होते. मागे उजव्या बाजूने बसलेले जाधव यांच्या शरीराचा काही भाग रिक्षाबाहेर होता. दरम्यान, मुंबईनाक्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीने (क्रमांक समजू शकला नाही) या रिक्षाला जोरदार धडक (कट) मारली. या धडकेत जाधव गंभीर जखमी झाले असून, त्यांचा उजवा पाय कमरेपासून खाली मोठ्या प्रमाणात कापला गेला आहे. मोटारीने कट मारल्यानंतर रिक्षाचालक कैलास गणपत घोडे (रा.लेखानगर) यांनी रिक्षाचे नियंत्रण सुटू दिले नाही त्यामुळे रिक्षा उलटली नाही. परिणामी अन्य प्रवासी सुखरूप बचावले. मोटारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, चालक घोडे यांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जाधव यांना तत्काळ त्याच रिक्षामधून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालू नये, वाहतूक पोलिसांनी नियमबा' वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाईची मोहीम राबविणे गरजेचे आहे, असे या अपघातातून बचावलेल्या रिक्षामधील महिला प्रवासी करिश्मा अनिल तळरेजा यांनी सांगितले आहे.