ऑक्सिजन संपल्याने गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:18+5:302021-04-09T04:15:18+5:30

नाशिक : नाशिक शहरातील काही खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येऊ लागल्याने ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना अन्यत्र हलवण्याची वेळ त्यांच्यावर ...

Serious patients moved elsewhere due to lack of oxygen! | ऑक्सिजन संपल्याने गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवले !

ऑक्सिजन संपल्याने गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवले !

Next

नाशिक : नाशिक शहरातील काही खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येऊ लागल्याने ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना अन्यत्र हलवण्याची वेळ त्यांच्यावर आली. या सर्व प्रकारांत बाधितांच्या कुटुंबीयांना धावाधाव आणि प्रचंड मनस्ताप सहन करण्यासह रुग्णाच्या आरोग्याबाबतची हेळसांड हतबलतेने पाहण्याशिवाय अन्य काहीच करता आले नाही.

शहरातील काही नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये गुरुवारी ऑक्सिजन साठा संपुष्टात येण्याची चिन्हे तेथील प्रशासनाला दिसू लागली. तरीदेखील खासगी ठेकेदाराकडून होणारा ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा उपलब्ध झाला नव्हता. अखेर काही रुग्णालयांनी तुमच्या रुग्णाला उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिजन बेडसाठी अन्य रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यामुळे बाधितांच्या कुटुंबीयांची प्रचंड धावपळ होण्यासह आता कुठे बेड उपलब्ध होणार अशी स्थिती निर्माण झाली. काही रुग्णालयांनी अन्यत्र प्रयत्न करून बेड उपलब्ध असलेल्या रुग्णालयात स्थलांतरित केले. तर काहींना स्वत:लाच उपलब्ध बेड शोधण्याची वेळ आल्याने त्यांची तर प्रचंड धावपळ झाली. या खासगी रुग्णालयांना ज्या पुरवठादाराच्या माध्यमातून हा ऑक्सिजन पुरवठा नियमितपणे सुरू होता, तो ऑक्सिजन त्याला मुरबाडहून नियमित टँकरने मिळत होता. मात्र, आता संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनची गरज निर्माण झाल्याने त्या पुरवठादाराच्या टँकरना प्रत्येक टँकर भरण्यापूर्वी रांगेत १२ ते १५ तास थांबावे लागत आहे. त्यामुळे साहजिकपणे खासगी हॉस्पिटल्सना होणाऱ्या पुरवठ्यात विलंब होऊ लागला आहे. त्यामुळेच त्यांना खासगी पुरवठादाराकडून ऑक्सिजन सिलिंडर्स त्वरित उपलब्ध होऊ शकले नाहीत. या सर्व बाबींमुळेच गंभीर रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर लावून ॲम्ब्युलन्समधून एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले. मात्र, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा, खासगी कंत्राटदार आणि संबंधित खासगी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय राखून पुन्हा तुटवडा जाणवू नये, यासाठी नियोजनपूर्वक काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Serious patients moved elsewhere due to lack of oxygen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.