बागलाणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात
By admin | Published: February 21, 2017 12:42 AM2017-02-21T00:42:21+5:302017-02-21T00:42:45+5:30
सज्जता : ५७ उमेदवार आजमावणार नशीब
सटाणा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बागलाण तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सात गटांतून २८, तर चौदा गणांतून ५७ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, मंगळवारी त्यांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बागलाण तालुक्यात २४६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील दोन लाख ३३ हजार ३५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. येथील तहसील आवारात कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले. तीस क्षेत्रीय अधिकारी, २७० मतदान केंद्राध्यक्ष तसेच प्रत्येकी २७० मतदान अधिकारी, शिपाई असे १६२० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानासाठी ४९२ मतदानयंत्रे व प्रत्येक गट, गणसाठी दहा टक्के राखीव मतदानयंत्रे ठेवली आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एक पोलीस उपअधीक्षक, एक स्थानिक पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी १२, पोलीस कर्मचारी २५०, गृहरक्षक दलाचे जवान १४५ व गृहरक्षक दलाच्या महिला कर्मचारी ४५ असा लवाजमा तैनात करण्यात आल्या आहे. जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी २८ उमेदवार नशीब अजमावत रिंगणात आहेत, तर गणात एकूण चौदा जागांसाठी ५७ उमेदवार नशीब आजमावत आहे. (वार्ताहर)