गुरुपीठातील शिलापूजनास परदेशातूनही येणार सेवेकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 01:52 AM2022-06-17T01:52:15+5:302022-06-17T01:52:39+5:30
त्र्यंबकेश्वर येथील सद्गुरू मोरेदादा रुग्णालयाच्या शिलापूजन सोहळ्यात देशभरातून महिला, पुरुष सेवेकरी येणार आहेतच; पण नेपाळसह अमेरिका, दुबई, ओमान, इंग्लंड, अबुधाबी अशा अनेक देशांमधूनसुद्धा सेवेकरी मोठ्या प्रमाणात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे देश-विदेश अभियान प्रमुख नितीन मोरे यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर : येथील सद्गुरू मोरेदादा रुग्णालयाच्या शिलापूजन सोहळ्यात देशभरातून महिला, पुरुष सेवेकरी येणार आहेतच; पण नेपाळसह अमेरिका, दुबई, ओमान, इंग्लंड, अबुधाबी अशा अनेक देशांमधूनसुद्धा सेवेकरी मोठ्या प्रमाणात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे देश-विदेश अभियान प्रमुख नितीन मोरे यांनी दिली.
नितीन मोरे यांनी नुकताच नेपाळ दौरा केला. नेपाळमध्ये सेवा मार्गाच्या कार्यास उत्तम प्रतिसाद लाभत असून तीन दिवसांच्या तेथील विविध कार्यक्रमात दहा हजारांपेक्षा अधिक सेवेकरी, भाविक, विद्यार्थी, पालक यांनी हजेरी लावली. तीन दिवसांच्या समर्थ महोत्सवात सहभागी झालेल्या बऱ्याच सेवेकऱ्यांनी गुरुपीठातील सोहळ्यातही सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
नेपाळप्रमाणेच इतर अनेक देशांमध्ये समर्थ केंद्र सुरू झाले असून तेथील शेकडो तरुण सेवेकरी सक्रिय झाले आहेत. या देशांमधूनही सेवेकरी त्र्यंबकेश्वरी येणार आहेत.
दरम्यान गुरुपीठातील कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरू आहे. अमित शाह यांच्या दिल्ली कार्यालयातील अधिकारी गुरुपीठ प्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. जिल्हाधिकारी डी. गंगाधरन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनीही भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.