सर्व्हर डाउनमुळे आयटीआय प्रवेश रखडले
By admin | Published: June 18, 2016 10:45 PM2016-06-18T22:45:16+5:302016-06-18T22:47:01+5:30
सर्व्हर डाउनमुळे आयटीआय प्रवेश रखडले
सातपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या जाहीर झाली आहे; मात्र संकेतस्थळ सर्व्हर डाउन असल्याने सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. विशेष म्हणजे संस्थेकडून विद्यार्थ्यांना याबाबत काहीही माहिती पुरविली जात नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने तीन वर्षांपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे; मात्र दरवर्षी ही प्रक्रिया सुरळीत होत नाही. यावर्षीदेखील सर्व्हर डाउनची समस्या उद्भवली आहे. १५ जूनपासून प्रवेशप्रक्रि या जाहीर करण्यात आली आहे. प्रवेशार्थी विद्यार्थी संस्थेत धाव घेत आहेत; मात्र संकेतस्थळ सुरू होत नसल्याने त्यांचे प्रवेश होऊ शकत नाहीत. याबाबतची अधिकृत माहिती देण्यास कोणीही तयार नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रवेश नेमके कधी सुरू होणार याबाबत संबंधित अनभिज्ञ आहेत.
यावर्षी २७ विविध व्यवसाय अभ्यासक्र मासाठी एक हजार ३१२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश आणि माहिती घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे; मात्र प्रवेशाविषयी ठोस माहिती उपलब्ध होत नसल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. (वार्ताहर)