सर्व्हर डाउनचा विद्यार्थ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:58 PM2019-06-25T23:58:10+5:302019-06-26T00:25:25+5:30
शाळा-महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया सुरू असताना जिल्हा प्रशासनाने सेतू कार्यालय बंद केल्याने विद्यार्थी व पालकांची विविध दाखले मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरच्या व इतर अडचणींमुळे दाखले वितरणाचे काम धीम्या गतीने होत असल्याने विद्यार्थी-पालक अत्यंत त्रस्त झाले आहेत.
नाशिकरोड : शाळा-महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया सुरू असताना जिल्हा प्रशासनाने सेतू कार्यालय बंद केल्याने विद्यार्थी व पालकांची विविध दाखले मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरच्या व इतर अडचणींमुळे दाखले वितरणाचे काम धीम्या गतीने होत असल्याने विद्यार्थी-पालक अत्यंत त्रस्त झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून पाच दिवसांपूर्वी (दि.२०) नाशिकरोड, सातपूर, पंचवटी, सिडको येथील चार सेतू कार्यालये बंद करण्यात आली. ऐन शाळा, महाविद्यालय प्रवेशप्रक्रिया सुरू असताना जिल्हा प्रशासनाने सेतू कार्यालय बंद केल्याने विद्यार्थी व पालकांची विविध दाखल्यांसाठी मोठी गैरसोय होत आहे. सेतू कार्यालयात उत्पन्नाचा, डोमासाईल, नॉन क्रिमिलीयर, जात प्रमाणपत्र व रेशन कार्डमधील नाव कमी करणे, नवीन समाविष्ट करणे, नवीन रेशनकार्ड काढून देणे ही कामे केली जातात. शहरातील चारही सेतू कार्यालयांची गेल्या २३ मेपर्यंतच मुदत होती. मात्र त्यानंतरही सेतू कार्यालय जिल्हा प्रशासनाने २० जूनपर्यंत सुरू ठेवल्याने विविध दाखल्यांचे अर्ज स्वीकारणे व दाखले काढून देण्याचे काम सुरू होते. चारही सेतू कार्यालये बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयात २० जूनपर्यंत स्वीकारलेल्या अर्जांचे दाखले देण्याचे काम सुरू आहे. सर्व्हर डाउन व इतर अडचणींमुळे दाखले देण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. विद्यार्थी, पालकांना त्यामुळे तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.
निर्धारित वेळेत दाखले न मिळाल्यास प्रवेशाला अडचण निर्माण होत असल्याने पालकांमध्ये चिंता पसरली आहे. सेतू कार्यालयच बंद केल्याने शहराच्या विविध भागातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांना येण्या-जाण्याचा खर्च करत जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.