तालुक्याच्या ठिकाणी मोफत डायलेसीस केंद्र साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:07 AM2018-05-30T00:07:32+5:302018-05-30T00:08:28+5:30
राज्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांकरिता दहा हजार खाटा राखीव आहेत. त्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असून, गरजू रु ग्णांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोफत डायलेसिस केंद्र धर्मादाय संस्थेच्या मदतीने लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सन्मान सोहळ्यात बोलताना केली.
नाशिक : राज्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांकरिता दहा हजार खाटा राखीव आहेत. त्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असून, गरजू रु ग्णांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोफत डायलेसिस केंद्र धर्मादाय संस्थेच्या मदतीने लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सन्मान सोहळ्यात बोलताना केली. सामुदायिक विवाह सोहळा समिती या धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून ९६ वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा चोपडा लॉन्समध्ये पार पडला. या सोहळ्याचे उत्कृष्ट संयोजन केल्याबद्दल समिती सदस्यांचा सन्मान सोहळा धर्मादाय आयुक्त कार्यालय, नाशिकच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डिगे बोलत होते. आत्महत्याग्रस्त व कर्जबाजारी शेतकरी, भूमिहीन नागरिक आणि गोरगरीब कुटुंबीयांतील वधू-वरांकरिता संपूर्ण महाराष्ट्रात सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून ३०४६ विवाह लावण्यात आले आणि त्या माध्यमातून धर्मादाय संस्था गोरगरीब माणसांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे भविष्यात लग्न कसे होणार या चिंतेने होणाऱ्या आत्महत्या थांबू शकतील, असा विश्वास शिवकुमार डिगे यांनी व्यक्त केला.कार्यक्र माचे प्रास्ताविक धर्मादाय सह आयुक्त प्रदीप घुगे यांनी केले. डिगे यांचा सत्कार क. का. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी धर्मादाय उपायुक्त कांचनगंगा सुपाते-जाधव, समिती सदस्य केशवराव पाटील, श्रीकांत बेणी, सुनील चोपडा, अॅड. सुरेखा जोशी, अजयकांत मंडावेवाला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सहायक धर्मादाय आयुक्त के. एम. सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन सहायक धर्मादाय आयुक्त वैशाली पंडित यांनी केले.
समिती सदस्यांचा गौरव
यावेळी सामुदायिक विवाह सोहळा समितीचे सदस्य केशवराव पाटील, श्रीकांत बेणी, अॅड. सुरेखा जोशी, सुनील चोपडा, प्रवीण जोशी, हेमलता बिडकर, प्रवीणचंद्र देसाई, राजीव जाधव, अजयकांत मंडावेवाला, डॉ. रावसाहेब शिंदे, अॅड. शशिकांत पवार, सुदर्शन दहातोंडे, डॉ. प्रभाकर वडजे, आनंद महाले, डॉ. दौलतराव महाले, अॅड. भाऊसाहेब गंभिरे यांचा डिगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.