नाशिकरोडला सव्वाशे मंडळांत देवीची स्थापना
By admin | Published: October 2, 2016 12:01 AM2016-10-02T00:01:55+5:302016-10-02T00:46:12+5:30
नवरात्रोत्सव : वाजत-गाजत घटस्थापना; सार्वजनिक मंडळांच्या वतीने विविध उपक्रम
नाशिकरोड : परिसरातील घराघरांत व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी शनिवारी मोठ्या भक्तिभावाने वाजत-गाजत घट व देवीच्या मूर्तीची स्थापना केली. नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास १२५ हून अधिक छोट्या-मोठ्या सार्वजनिक मंडळांनी देवीची स्थापना केली आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी सकाळपासून घट व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी देवळालीगाव, शिवाजी पुतळा, भाजीबाजार, जेलरोड इंगळेनगर येथे मोठी गर्दी केली होती. सकाळनंतर मुहूर्त बघून घरोघरी विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. तसेच नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लहान-मोठ्या १२५ हून अधिक मंडळांनी नवरात्र सण साजरा करण्याची परवानगी घेतली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्री देवीच्या मूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्थापना केली. सर्वज्ञ फाउंडेशन, सुभाषरोड सांस्कृतिक मित्रमंडळ, छत्रपती मित्रमंडळ, शिवशाही प्रतिष्ठान, श्री सप्तशृंगी कला व सांस्कृतिक मित्रमंडळ, सप्तशृंगी मित्रमंडळ एकलहरे, शिवाजीनगर मित्रमंडळ, धनंजय सोशल ग्रुप सामनगावरोड, वैष्णवी सोशल फाउंडेशन, मॉडेल कॉलनी वसंतविहार मित्रमंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, संग्राम कला-क्रीडा मंडळ, एकता मित्रमंडळ, आझाद मित्रमंडळ एकलहरा, वज्रेश्वरी मित्रमंडळ, कुरण मित्रमंडळ, किरण शिव मित्रमंडळ, चेहेडी श्रद्धापार्क सांस्कृतिक मित्रमंडळ, जेलरोड आदिंसह अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे.
नाशिकरोडची ग्रामदैवत असलेल्या श्री दुर्गा देवी मंदिरात प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे यांच्या हस्ते पूजा करून घटस्थापना करण्यात आली. देवळालीगाव श्री रेणुकामाता मंदिर, सुभाषरोड, जगताप मळा श्री सप्तशृंगीमाता मंदिर, देवी चौक, टिळकपथ श्री संतोषीमाता मंदिर, जयभवानी रोड, जेलरोड श्री दुर्गादेवी मंदिर आदि ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने पूजा करून घटाची स्थापना करण्यात आली. नवरात्रीनिमित्त देवी मंदिरांमध्ये मंडप उभारून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दुपारनंतर देवी मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)