कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत लवकरच काढणार तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:16 AM2018-05-13T00:16:11+5:302018-05-13T00:16:11+5:30
कामगार दिन १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांनी सुरू केलेले आंदोलन ठोस तोडगा निघेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सिटूच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. सिटूच्या नेत्यांनी या प्रकरणी शुक्रवारी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सर्व पुरावे सादर केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून, विद्यापीठाला जिल्हाधिकाºयांकडे चर्चेसाठी बोलावण्यात येणार असल्याचे समजते.
नाशिक : कामगार दिन १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांनी सुरू केलेले आंदोलन ठोस तोडगा निघेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सिटूच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. सिटूच्या नेत्यांनी या प्रकरणी शुक्रवारी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सर्व पुरावे सादर केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून, विद्यापीठाला जिल्हाधिकाºयांकडे चर्चेसाठी बोलावण्यात येणार असल्याचे समजते. आरोग्य विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाºयांनी समान काम आणि समान दाम या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे, तर १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. उपोषणकर्त्यांपैकी सहा कर्मचाºयांची प्रकृती खालावल्याने आंदोलनाला वेगळेच वळण मिळाले होते. विद्यापीठाच्या अधिकाºयांनी ऐनवेळी घूमजाव केल्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी उपोषणकर्त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी सिटूच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे पोलिसांना माघारी फिरावे लागले.
याच प्रश्नावर शुक्रवारी सिटूचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, कॉम्रेड श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे, कॉँग्रेस नेते शरद अहेर यांनी पोलीस आयुक्त सिंगल यांची भेट घेऊन उपोषण सनदशीर आणि कायदेशीर सुरू असल्याचे सांगितले. आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नसताना पोलीस आंदोलन दडपत असल्याचा आरोप करण्यात आला. उपोषण दोन दिवसांपूर्वीच मिटले असते; मात्र विद्यापीठाने घूमजाव केल्याचेही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी या प्रकरणी लवकर तोडगा निघणे अपेक्षित असल्याचे सांगून विद्यापीठाचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकाºयांसमवेत चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे सांगून यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. परंतु निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी नेत्यांनी केला.
विद्यापीठाकडून दिशाभूल
कंत्राटी कर्मचारी हे विद्यापीठाचेच असून, विद्यापीठाच्या वकिलाने विद्यापीठ हे ‘प्रिन्सपल एम्लॉयर’ असल्याचे कोर्टात यापूर्वीच सांगितल्याचे तसेच मे. विशाल इंटरप्रायजेसने आपण या कर्मचाºयांची नियुक्ती केली नसून त्यांना कामावरून कमी करण्याचा प्रश्नच नसल्याने विद्यापीठाने त्यांना कामावरून कमी केल्याचे म्हटल्याने विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांची जबाबदारी नाकारून दिशाभूल करीत असल्याचा आरोप सिटूने केला आहे.