दुसरी ते दहावीपर्यंत सेतू अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:22+5:302021-07-05T04:10:22+5:30

नव्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे. मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाइन व इतर विविध ...

Setu course from 2nd to 10th | दुसरी ते दहावीपर्यंत सेतू अभ्यासक्रम

दुसरी ते दहावीपर्यंत सेतू अभ्यासक्रम

Next

नव्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे. मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाइन व इतर विविध मार्गाने शिक्षण सुरू होते; परंतु ते सर्वच विद्यार्थ्यांना मिळाले व त्यांच्या क्षमतांचा अपेक्षित विकास झाला असे मात्र ठामपणे सांगता येत नाही. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यास महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, अधिकारी व शिक्षक यांच्या मदतीने तयार केला आहे.

त्यासाठी काय करायचं? प्रत्येक विषयाचा सेतू अभ्यास दिवसनिहाय दिलेल्या क्रमाने सोडवायचा आहे. यात वेगवेगळ्या कृतींचा समावेश आहे. या कृती सोडवताना विद्यार्थ्यांना मजा येईल. दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृती स्वप्रयत्नाने सोडवाव्यात. कृती सोडवताना अडचण आल्यास शिक्षक किंवा पालकांनी विद्यार्थ्यांना मदत करावी. प्रत्येक कृतीमध्ये दिलेला पाठ्यांश अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी व्हिडिओ लिंक दिल्या आहेत, त्यांचा उपयोग करून संकल्पना समजून घ्याव्यात. ४५ दिवसांचा सेतू अभ्यास करताना यामध्ये दर १५ दिवसांनी एक छोटीशी चाचणी सोडवायची आहे. चाचणी विद्यार्थ्याने स्वतः एकट्याने सोडवा. चाचणी सोडवून झाल्यावर शिक्षकांकडून/ पालकांकडून तपासून घ्या.

सदर अभ्यास हा इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून तो मागील इयत्तेच्या पाठ्यपुस्तकाशी संलग्न व त्यातील घटकांवर आधारित आहे. सदर अभ्यासात क्षेत्र, कौशल्य, संकल्पना व अध्ययन निष्पत्ती/क्षमता विधाने यांचा समावेश केला आहे. संबंधित संकल्पनेबाबत विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जाणून घेण्यासाठी ‘जाणून घेऊ या’, त्या संकल्पनेबाबत त्याने अधिक सक्षम व्हावे यासाठी ‘सक्षम बनू या’, मिळालेल्या माहितीचे किती आकलन झाले यासाठी ‘सराव करू या’ व मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्याने आधी चिकित्सक विचार करावा, सर्जनशील व्हावे अर्थात ‘कल्पक होऊ या’ या सदरांचा समावेश केला आहे.

कोट...

प्रत्येक विषयाच्या मूलभूत क्षमता व इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती विचारात घेऊन पाठ्यपुस्तकातील कृती व उपक्रमांचा समावेश सेतू अभ्यासात केला आहे. अगोदरच्या इयत्तेत अभ्यास करताना राहून गेलेला भाग व पुढील इयत्तेत आत्मसात करावयाचा अभ्यास यांचा सेतू म्हणजेच सेतू अभ्यास होय.

- डॉ. बाबासाहेब बडे, सेतू-अभ्यास निर्मिती गटप्रमुख (विषय- मराठी)

Web Title: Setu course from 2nd to 10th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.